

पणजी : पुढारी वृत्तसेवा
आगामी गोवा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पक्ष (आप) आणि गोवा फॉरवर्ड पार्टी (जीएफपी) यांनी एकत्र येत 'गोवा फर्स्ट अलायन्स'ची घोषणा केली. पणजी येथे झालेल्या कार्यक्रमात या आघाडीचा औपचारिक प्रारंभ करण्यात आला.
भाजप आणि काँग्रेस या दोन्ही प्रमुख पक्षांना पर्याय देणारी बिगर-भाजप, बिगर-काँग्रेस आघाडी म्हणून 'गोवा फर्स्ट' आघाडी स्थापन केली आहे. आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल म्हणाले की, गोव्याच्या जनतेचा यापूर्वी दोनदा विश्वासघात झाला असून, तिसऱ्यांदा असा विश्वासघात होऊ देणार नाही.
आमची आघाडी 'गोवा फर्स्ट', तर भाजप आणि काँग्रेस हे 'गोवा लास्ट' अजेंड्यावर चालत असल्याचा टोला त्यांनी लगावला. आमदार विजय सरदेसाई म्हणाले की, २०१७ व २०२२ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने स्पष्ट बहुमत नसतानाही काँग्रेसचे आमदार घेऊन सत्ता स्थापन केली.
त्यामुळे ज्यांनी काँग्रेसला मतदान केले ते या फुटीर आमदारांवर नाराज आहेत. त्यामुळे काँग्रेसशी बोलणी बंद करून आपबरोबर चर्चा करून ही आघाडी स्थापन केली, असे त्यांनी स्पष्ट केले.
या पत्रकार परिषदेला गोवा फॉरवर्ड पक्षातर्फे अध्यक्ष व आमदार विजय सरदेसाई, दीपक कळंगुटकर, ॲड. अस्मा बी, मेशू डिकॉस्ता व विकास भगत तर आम आदमी पक्षातर्फे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल, अतिशी, आमदार वेंझी व्हिएगस, आमदार क्रुझ सिल्व्हा व वाल्मिकी नाईक उपस्थित होते.
आ. विजय सरदेसाई म्हणाले, की गोवेकर संयुक्त विरोधी पक्षाची मागणी करत आहेत. गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर 'गोवा फर्स्ट अलायन्स' हे त्या मागणीचे उत्तर आहे. काँग्रेस आणि भाजपच्या पारंपरिक मतदारांचा विश्वासघात झाल्याची भावना आहे.
आपसोबत आघाडी करण्यामागील कारण स्पष्ट करताना सरदेसाई म्हणाले की, 'आप'ने गोव्यात पक्षांतराचा मार्ग स्वीकारला नाही. २०२२ मध्ये काँग्रेससोबत मित्रपक्ष म्हणून निवडणूक लढवल्यानंतर पुढील राजकीय चर्चेत बदल झाले; मात्र जीएफपीने फसवणूक केली नसल्याचा दावा त्यांनी केला.