

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
शहरभरात व्हॅलेंटाइन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळपासूनच फुलांची दुकाने, गिफ्ट शॉप्स, कॅफे आणि रेस्टॉरंट्समध्ये तरुणाईची गर्दी पाहायला मिळाली. लाल गुलाब, चॉकलेट्स, टेडी बेअर्स आणि आकर्षक भेटवस्तूंना मोठी मागणी होती.
कॉलेज परिसर, गार्डन्स आणि गोदावरी नदीकाठी जोडपी एकत्र येऊन हा दिवस साजरा करताना दिसली. अनेकांनी सोशल मीडियावर खास फोटो आणि संदेश शेअर करून आपल्या भावना व्यक्त केल्या.
शहरातील प्रमुख कॅफे आणि रेस्टॉरंट्सनी खास ऑफर्स आणि सजावटीतून वातावरण अधिक रंगतदार केले होते. फुलविक्रेत्यांनी सांगितले की, यंदा लाल गुलाबांच्या किमतीत थोडी वाढ झाली असली, तरी विक्री चांगली झाली आहे.
तरुणाईने १०० रुपयांपासून, तर ५०० रुपयांपर्यंत लाल गुलाबांचा बुके विकत घेतला आहे. तसेच गिफ्ट शॉप मालकांनीही विक्री समाधानकारक झाल्याचे सांगितले. पोलिस प्रशासनाकडून शहरातील गर्दीच्या ठिकाणी योग्य ती खबरदारी घेण्यात आली होती. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी गस्त वाढविण्यात आली होती.
व्हॅलेंटाइन दिनानिमित्त काही सामाजिक संस्थांनी वृद्धाश्रम आणि अनाथाश्रमात जाऊन प्रेमाचा संदेश देत फळे व मिठाईचे वाटप केले. प्रेम केवळ जोडप्यांपुरते मर्यादित नसून, समाजातील प्रत्येक घटकासाठी असावे, असा संदेश त्यांनी दिला. नाशिकमध्ये यंदाचा व्हॅलेंटाइन दिन आनंद, उत्साह आणि सकारात्मक वातावरणात साजरा झाला.