

नाशिक : नाशिक येथून उत्तराखंड येथे तीर्थयात्रेसाठी गेलेले सात भाविक सुखरुप असून भारतीय सैन्याच्या हेलिकॉप्टरद्वारे त्यांना आर्मीबेसपर्यंत आणण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली. पुढील चार दिवसांत ते नाशिकला परतण्याची शक्यता आहे.
नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथील कोतकर कुटूंबातील 4 आणि येवले कुटूंबातील 3 जण उत्तराखंड येथे तीर्थयात्रेसाठी गेले होते. बुधवारी (दि.6) उत्तराखंडच्या उत्तरकाशी जिल्ह्यात झालेल्या ढगफुटीमुळे मोठा पूर आला. या भीषण संकटात नाशिक जिल्ह्यातील सात भाविक अडकल्याची माहिती जिल्हा प्रशासनाला मिळाली होती. मात्र मालेगाव येथील गौरव येवले यांनी दिलेल्या माहितीनूसार व्हॉईसनोटद्वारे प्राप्त संदेशानूसार सातही पर्यटक सुखरुप असल्याचे जिल्हा प्रशासनातर्फे सांगण्यात आले. सर्व पर्यटक हे देहरादूनकडे उतरले असून त्यानंतर त्यांना देहरादून येथून आर्मीबेस कॅम्पकडे हेलिकॉप्टरद्वारे नेण्यात आले. पुढील चार दिवसांत हे सातही पर्यटक परतण्याची शक्यता जिल्हा प्रशासनाकडून वर्तविण्यात आली आहे.
उत्तराखंड राज्यातील उत्तरकाशी जिल्ह्यातील धराली परिसरात झालेल्या भूस्खलन आणि पूरस्थितीमुळे महाराष्ट्रातील विविध भागांतील एकूण 172 पर्यटक अडकलेले असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आणि संबंधित यंत्रणेकडून प्राप्त झाली आहे. सर्व प्रवासी सुखरूप असून त्यापैकी 171 पर्यटकाशी संपर्क झाला असून ते सुरक्षित ठिकाणी आहेत. उर्वरित एक पर्यटक कृतिका जैन यांच्याशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आपत्ती व्यवस्थापन व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन हे उत्तराखंडमध्ये दाखल झाले असून त्यांनी विविध ठिकाणी अडकलेल्या पर्यटकांशी दूरध्वनीद्वारे संवाद साधून शासनाकडून करण्यात येत असलेल्या उपायोजनाची माहिती दिली.