

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा
निफाड तालुक्यातून नाशिक शहरात एमडी (मेफेड्रोन) या अमली पदार्थाची विक्री करण्यासाठी येणाऱ्या तिघा संशयितांना आडगाव पोलिसांनी सापळा रचून ताब्यात घेतले. या कारवाईत पोलिसांनी २२ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, ग्रामीण भागातून शहरात अमली पदार्थांची तस्करी होत असल्याचा प्रकार पुन्हा समोर आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (दि.२९) पहाटे पावणेपाचच्या सुमारास नाशिककडे येणाऱ्या मार्गावरील महाडसांगवी टोलनाक्याजवळ पुलाखाली एक संशयित स्कॉर्पिओ (एम.एच. १५ जे.एस. ४५९७) उभी असल्याची माहिती आडगाव पोलिसांना मिळाली होती. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने घटनास्थळी धाव घेत छापा टाकला.
या कारवाईत सुदाम मुरलीधर सोनवणे (रा. भुसे, ता. निफाड), विशाल दत्तात्रय शिंदे व विवेक नवनाथ खालकर दोघे (रा. भेंडाळी, ता. निफाड) यांना ताब्यात घेण्यात आले. संशयितांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडून ६.५ ग्रॅम वजनाचा एमडी अमली पदार्थ आढळून आला.
तसेच अमली पदार्थ वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली स्कॉर्पिओ व एक मोबाइल फोन पोलिसांनी जप्त केला. या कारवाईत एकूण २२ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून, संशयितांविरुद्ध आडगाव ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
दरम्यान, शहरात एमडी ड्रग्जविरोधात पोलिसांनी धडक मोहीम हाती घेतलेली असून, संशयितांच्या बारीक हालचालीवर लक्ष ठेवून कारवाई केली जात आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक अहिरे, सहायक पोलिस निरीक्षक निखिल बोंडे यांनी केली. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक व्ही. जे. पंचमुख करीत आहेत.