नाशिक : भारतातून आखाती राष्ट्रांना होणारी केळी निर्यात गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात वाढली आहे. भारतातून दरवर्षी सरासरी 1.5 लाख ते 2 लाख मेट्रिक टन केळी आखाती देशांना निर्यात केली जाते. ती युद्धामुळे रखडली आहे. दरवर्षी आखाती देशांना केळी निर्यात करून भारत सुमारे 800 ते 1000 कोटी रुपयांचे परकीय चलन मिळवतो. आखाती देशांकडे दररोजचे 12 कंटेनर केळी पाठविले जातात. परंतु सध्या अमेरिका-इराण तणावामुळे ही वाहतूक बंद आहे.
आखाती देशांमध्ये संयुक्त अरब अमिराती हा भारतीय केळींचा सर्वात मोठा खरेदीदार आहे. एकूण भारतीय केळी निर्यातीपैकी सुमारे 40 ते 45 टक्के वाटा एकट्या आखाती देशांचा आहे. या निर्यातीत महाराष्ट्र (जळगाव जिल्ह्याचा) सुमारे 30 टक्के, तर गुजरातचा वाटा सुमारे 70 टक्के आहे.
लाल समुद्रात हुती बंडखोर मालवाहू जहाजांवर हल्ले करत असल्यामुळे युरोपला जाणारी निर्यात महागली असली तरी, आखाती देशांसाठी समुद्रमार्ग सुलभ असल्याने तिथल्या निर्यातीत 15 ते 20 टक्के वाढ होण्याची शक्यता होती. परंतु ती धोक्यात आली आहे.
भारतातून होणाऱ्या एकूण केळी निर्यातीत महाराष्ट्र 30 टक्क्यांपेक्षा जास्त वाटा उचलतो. त्यामध्ये जळगाव जिल्ह्यातील ‘ग्रँड नैन’ या जातीच्या केळींना आखाती देशांतून प्रचंड मागणी असते. जळगावच्या केळींना ‘जीआय टॅग’ मिळाल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत त्यांची विश्वासार्हता वाढली आहे. ती युरोपातही पोहोचली आहे. जिल्ह्यातून 2025 मध्ये सुमारे 7,500 कंटेनर (म्हणजेच सुमारे 1.5 लाख टन) केळी निर्यात होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.