

नाशिक : भारतातून आखाती राष्ट्रांना दरवर्षी तीस हजार मेट्रिक टन द्राक्षाची निर्यात होते. इराण युद्धामुळे द्राक्ष निर्यात शनिवार (28 फेब्रुवारी)पासून ठप्प झाली आहे. स्थानिक निर्यातदार व्यापाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार जेएनपीटी बंदराबाहेर आखाताला जाणारे द्राक्षाचे सुमारे तीनशे वातानुकूलित कंटेनर अडकले आहेत. युद्ध लांबल्यास नाशिक जिल्ह्याला दोनशे कोटी रुपयांच्या विदेशी चलनातील उत्पन्नाला मुकावे लागणार आहे. नाशिक जिल्ह्यात सध्या 19 हजार हेक्टरवर निर्यातीचा द्राक्षमाल उभा आहे.
भारत प्रामुख्याने नेदरलँड्स, ब्रिटन आणि जर्मनीनंतर संयुक्त अरब अमिराती आणि सौदी अरेबिया या आखाती देशांना मोठ्या प्रमाणावर द्राक्षे निर्यात करतो. विदेशी व्यापार महासंचालनालय आणि ‘अपेडा’कडील उपलब्ध आकडेवारीनुसार, भारतातून निर्यात होणाऱ्या द्राक्ष निर्यातीत नाशिक जिल्ह्याचा वाटा तब्बल 70 टक्के आहे.
गतवर्षी भारतातून आखातात झालेल्या एकूण निर्यातीपैकी सुमारे 22 हजार मेट्रिक टन द्राक्षे नाशिक जिल्ह्याचे होते. आखाती देशांमध्ये प्रामुख्याने थॉमसन सीडलेस आणि शरद सीडलेस (काळी द्राक्षे) या जातींना मोठी मागणी असते. आखातातील रमजान नाशिकच्या द्राक्षांमुळे दरवर्षी गोड होतो. या सीझनमध्ये फक्त भारतातीलच द्राक्ष उपलब्ध असतात, त्यामुळे रमजान आणि द्राक्षे हे समीकरण तेथे घट्ट झालेले आहे.
आखाती राष्ट्रांमध्ये दुबई हा भारतीय द्राक्षांचा सर्वात मोठा ग्राहक आहे. एकूण भारतीय द्राक्ष निर्यातीपैकी साधारण 10 ते 12 टक्के वाटा आखाती देशांचा असतो. 2023-24 या वर्षात निर्यातीत चांगली वाढ झाली आहे. रशिया-युक्रेन युद्धामुळे युरोपला जाणाऱ्या मालात अडथळे येत असल्याने निर्यातदारांनी आखाती बाजारपेठांवर अधिक लक्ष केंद्रित केलेले आहे. परंतु आता ट्रम्प नीतीचा प्रचंड फटका नाशिक जिल्ह्याला बसत आहे.
लाल समुद्रातील हुती बंडखोरांच्या हल्ल्यांमुळे युरोपला जाणाऱ्या जहाजांचा खर्च वाढल्याने, भारतीय निर्यातदारांनी 2025 आणि 2026 च्या हंगामात दुबई आणि सौदी अरेबियाच्या बाजारपेठांवर अधिक भर दिला. परंतु इराण युद्धामुळे निर्यात सुरू होत असताना इराण युद्धामुळे कंटेनर मुंबईतच अडकून पडले आहेत.
यंदा निर्यातीतून 15 टक्के उत्पन्नवाढीची शक्यता होती. परंतु ती आता धोक्यात आली आहे. आखातासाठी तीनशे कंटेनर तयार आहे. तर युरोप आणि रशियासाठी 700 ते 900 कंटेनर जहाजांच्या प्रतीक्षेत आहेत. कंटेनर भाडे 300 टक्क्यांनी वाढले असून, ते आता 5 ते 6 हजार डॉलरवर पोहोचले आहेत. परिणामी, द्राक्ष निर्यातीला ब्रेक बसण्याची शक्यता आहे.
इराण युद्धामुळे द्राक्ष खरेदीदार व्यापारी बागांकडे फिरकतच नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. विदेशी व्यापार महासंचालनालय आणि ‘अपेडा’कडील ‘ग्रेपनेट’ प्रणालीच्या आकडेवारीनुसार, 2025-26 च्या चालू हंगामासाठी नाशिक जिल्ह्यात यंदा एकूण 31,564 द्राक्षबागांची निर्यातीसाठी अधिकृत नोंदणी झालेली आहे. या नोंदणीकृत बागांचे एकूण क्षेत्र सुमारे 18,750 हेक्टर इतके आहे.
नाशिक जिल्ह्यात निफाड तालुक्यातून सर्वाधिक नोंदणी झाली असून, त्यापाठोपाठ दिंडोरी आणि नाशिक तालुक्यांचा क्रमांक लागतो. महाराष्ट्रातून यंदा एकूण सुमारे 46,500 बागांची नोंदणी झाली असून, त्यापैकी 68 टक्क्यांपेक्षा जास्त वाटा एकट्या नाशिक जिल्ह्याचा आहे. रशिया आणि दुबईच्या बाजारपेठेसाठी नोंदणी करणाऱ्या शेतकऱ्यांच्या संख्येत गेल्या वर्षीच्या तुलनेत 10 ते 12 टक्क्यांनी वाढ झाली आहे. परंतु हे शेतकरी आता अडचणीत आले आहेत.
आखाती देशांमध्ये माल पोहोचण्यासाठी कमी वेळ लागत असल्याने तिथे दरांमध्ये स्थिरता असते. गत आठवड्यात तेथे भारतीय द्राक्षांसाठी घाऊक दर किलोला 85 ते 110 रुपये, तर मॉलमधील किरकोळ दर 140 ते 180 रुपये होता. युरोपमध्ये माल पोहोचवण्यासाठी लागणारा वेळ आणि खर्च वाढल्याने तिथे द्राक्षांचे दर तेजीत आहेत. तेथे घाऊक दर 160 ते 190, तर किरकोळ दर 350 ते 550 किलो (सुपरमार्केट पॅकिंगमध्ये) असे आहेत.
आखाती तणावामुळे मालवाहतूक खर्च तीन पटीने वाढला आहे. जहाजांना आफ्रिकेला वळसा घालून जावे लागत असल्याने प्रवासाचा काळ 14 दिवसांनी वाढला आहे आणि त्यामुळे युरोपमध्ये भारतीय द्राक्षांची टंचाई निर्माण होऊन दरात 20-25 टक्के वाढ झाली आहे.