

नाशिक : नाशिक शहराच्या नियोजनबध्द विकासाला आता चालना मिळणार आहे. शहर विकास योजनेच्या अंमलबजावणीसाठी तसेच शहर सौंदर्यीकरणासाठी राज्य शासनाच्या निर्देशांनुसार आयुक्त तथा प्रशासक मनीषा खत्री यांच्या अध्यक्षतेखाली नागरी संरचना समिती स्थापन्याच्या प्रस्तावाला महासभेने मंजूरी दिली आहे.
शहरातील प्रमुख प्रकल्पांसाठी मास्टर प्लॅन तयार करणे, व्यवसाय, पर्यटनाला चालना देण्यासाठी उपाययोजना सुचविणे आणि रस्ते, चौकांची रंगसंगती, सौंदर्यीकरण, वाहतूक नियोजन करण्यात समिती महत्त्वाची भूमिका निभावणार आहे.
राज्यातील महापालिका, नगरपालिका यासारख्या नियोजन प्राधिकरणांच्या क्षेत्रातील नागरिकांना भौतिक व सामाजिक सोयीसुविधा पुरविण्यासाठी विकास योजना तयार केली जाते. विकास योजनेच्या अंमलबजावणीचा कालावधी २० वर्षे निश्चित करण्यात आला आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या प्रादेशिक योजना शासनाने मंजूर केल्या आहेत. शहरांचा विस्तार होत आहे. शहरामधील व्यवसाय आणि पर्यटनाला चालना देण्यासाठी नियोजन प्राधिकरणांच्या स्तरावर नागरी संरचना विभाग स्थापन करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. यासंदर्भात शासनाच्या सहचिवांचे पत्र नाशिक महापालिकेला प्राप्त झाले आहे. त्यानुसार महापालिकेने नागरी संरचना समिती स्थापन करण्याचा प्रस्ताव महासभेच्या मान्यतेसाठी सादर केला होता. त्याला बुधवारी आयुक्त मनीषा खत्री यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या महासभेत मान्यता देण्यात आली आहे.
नाशिक महापालिकेसाठी नेमण्यात येणाऱ्या नागरी संरचना समितीच्या अध्यक्षपदी आयुक्त तथा प्रशासक डॉ. मनीषा खत्री या असतील. नगररचना विभागाचे उपसंचालक हे विभागप्रमुख असतील. तर शहर अभियंता संजय अग्रवाल, शहरातील इतिहासतज्ज्ञ स्मिता कासार, वास्तुविशारद भालचंद्र चावरे, स्ट्रक्चरल इंजिनिअर दीपक कुलकर्णी, विशेष निमंत्रित सदस्य किरण चव्हाण हे या समितीचे सदस्य असतील. तसेच नगररचना सहाय्यक संचालक समितीचे सदस्य सचिव असतील
शहराचे मूळ सौंदर्य अबाधित ठेवून योजना प्रस्तावित करणे.
प्रमुख प्रकल्पांसाठी मास्टर प्लॅन तयार करणे.
व्यवसाय, पर्यटनाला चालना देण्यासाठी उपाययोजना सुचविणे.
उपाययोजनांच्या अंमलबजावणीची दक्षता घेणे.
रस्ते, चौकांची रंगसंगती, सौंदर्यीकरण, वाहतुक नियोजन करणे.
आवश्यक तज्ज्ञ व्यक्तींची नेमणूक करणे.