

नाशिक : महापालिकेत प्रशासकीय राजवट सुरू असताना काही माजी नगरसेवकांकडून विकास निधीसाठी 'दबंगगिरी' सुरू असल्याने बांधकाम विभागासमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. महापालिकेच्या अंदाजपत्रकातील प्रभाग विकास निधीपोटी १४२ कोटी रुपयांची तरतूद तसेच नगरसेवक स्वेच्छा निधीपोटी करण्यात आलेली सात कोटींची तरतूद आमच्या स्वाक्षरीनेच खर्च करावी, असा आग्रह या माजी नगरसेवकांकडून धरला जात असल्याचे वृत्त आहे.
नाशिक महापालिकेतील लोकशाही राजवट १५ मार्च २०२२ मध्ये संपुष्टात आली आहे. गेल्या तीन वर्षांपेक्षा अधिक काळापासून प्रशासकीय राजवट आहे. त्यामुळे महापालिकेत विकासकामांबाबत निर्णय घेण्याचे तसेच विकास निधी खर्चाचे संपूर्ण अधिकार प्रशासकांचे आहेत. चालू आर्थिक वर्षात महापालिकेच्या निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण होऊन नवीन नगरसेवकांच्या हाती महापालिकेचा कारभार जाईल, अशी अपेक्षा असल्यामुळे २०२५-२६ या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकात प्रशासकांनी प्रभाग विभाग निधी तसेच नगरसेवक स्वेच्छा निधीची तरतूद केली. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनंतर राज्य शासनाने महापालिका निवडणुकीची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यानुसार ३ ऑक्टोबरपर्यंत प्रभागरचना अंतिम करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानंतर मतदारयादी पुननिरीक्षण तसेच आरक्षण सोडतीचा कार्यक्रम पार पडेल. यासाठी लागणारा कालावधी लक्षात घेता जानेवारी २०२६ मध्ये महापालिकेच्या निवडणुकीसाठी मतदान होईल, असा अंदाज आहे. या निवडणुकीद्वारे येणाऱ्या नगरसेवकांना अंदाजपत्रकीय निधी खर्च करता येईल, असे प्रशासनाचे नियोजन आहे. मात्र काही माजी नगरसेवकांनी एक गट तयार करत या प्रभाग विभाग निधी आणि स्वेच्छा निधीसाठीच्या तरतुदींतून विकासकामे हाती घेण्याचा आग्रह धरला आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रभागात विकासकामे दाखविण्याचा या मागे प्रयत्न असला तरी लोकशाही राजवट अस्तित्वातच नसल्याने या माजी नगरसेवकांचा अट्टहास नियमबाह्य असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
विकास निधीसाठी आग्रह धरणारे ते माजी नगरसेवक शिंदे गटातील असल्याची चर्चा आहे. यासंदर्भात शिंदे गटाच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केली असता संबंधितांशी चर्चा करू, असे त्यांनी सांगितले.
महापालिकेत प्रशासकीय राजवट सुरू आहे. शहरातील प्रत्येक भागाचा समान विकास होण्यासाठी अंदाजपत्रकात सर्व प्रभागांकरिता समान तरतूद करण्यात आली आहे. त्यानुसार विकासकामांच्या प्रस्तावांची अंमलबजावणी सुरू आहे.
संजय अग्रवाल, शहर अभियंता, महापालिका. नाशिक.