

नाशिक: उपनगर पोलीस ठाण्याचे कामकाज नोव्हेंबर महिन्यापासून नूतन इमारतीत सुरू होईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी नगरसेवक राहुल दिवे यांना दिले.
नाशिक दौऱ्यावर आलेल्या फडणवीस यांना माजी नगरसेवक राहुल दिवे यांनी उपनगर पोलिस ठाण्याच्या स्थलांतराबाबत निवेदन दिले. त्यावर सकारात्मक प्रतिसाद देत फडणवीस यांनी त्वरित कारवाईचे आश्वासन दिल्याने आता प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर उपनगर पोलीस ठाणे अखेर नव्या इमारतीत स्थलांतरित होणार आहे.
सध्या उपनगर पोलीस ठाण्याचे कामकाज नेहरूनगर येथील आयएसपी/सीएनपी नोट प्रेस कामगार वसाहतीतील मनपा शाळेच्या इमारतीत सुरू आहे. मात्र हे ठिकाण पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्राच्या दृष्टीने अत्यंत गैरसोयीचे आहे. त्या परिसरात वस्ती तुरळक असल्याने रात्रीच्या वेळी विशेषतः महिलांना असुरक्षितता जाणवते. याशिवाय ठाण्याच्या सध्याच्या ठिकाणी मोबाईल नेटवर्कची तीव्र समस्या असल्याने अत्यावश्यक प्रसंगी संपर्क साधण्यात अडचणी येतात. या पार्श्वभूमीवर, ठाणे अधिक मध्यवर्ती ठिकाणी असावे, अशी मागणी माजी नगरसेवक राहुल दिवे यांनी अनेक वर्षांपासून सातत्याने केली होती. त्यांच्या पाठपुराव्यानंतर अखेर या मागणीला यश आले असून उपनगरातील म्हसोबा मंदिराजवळ उभारलेल्या तीन मजली नूतन इमारतीत पोलीस ठाण्याचे स्थलांतर होणार आहे.
इमारतीच्या उभारणीसाठी सुरुवातीला अनेक शासकीय अडचणी निर्माण झाल्या होत्या. माजी नगरसेवक राहुल दिवे यांनी महसूल विभागाकडे असलेली १५ गुंठे जागा गृहशाखेला पोलीस ठाण्यासाठी देण्यात यावी, यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. मात्र सुरुवातीला ही जागा तलाठी कार्यालयासाठी राखीव ठेवण्याचा प्रस्ताव होता. त्यानंतर महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी ५ गुंठे जागा तलाठी कार्यालयासाठी आणि १० गुंठे जागा पोलीस ठाण्यासाठी देण्याचा निर्णय घेतला. यामुळे बांधकामाचा मार्ग मोकळा झाला. नंतर गृहशाखेकडून त्या ठिकाणी पोलीस उपायुक्त कार्यालय स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र पुन्हा आढावा घेऊन तो निर्णय बदलण्यात आला आणि अखेर तेथे पोलीस ठाणेच उभारण्यात आले.
मनपाकडून बांधकाम पूर्णत्वाचा दाखला न मिळाल्याने ठाण्याचे स्थलांतर काही काळ लांबले होते. मात्र आता सर्व प्रक्रिया पूर्ण झाली असून, नोव्हेंबरपासून उपनगर पोलीस ठाणे नव्या इमारतीतून कार्यरत होणार आहे.