नाशिक : जगाला समतेचा संदेश देणाऱ्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांची जयंती अवतार दिन म्हणून सरकारने सर्व शासकीय कार्यालयांत साजरी करावी. अवतार दिनाला राज्य महोत्सवाचा दर्जा मिळावा, अशी आग्रही मागणी अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे अध्यक्ष महंत मोहनराज कारंजेकरबाबा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर मांडली.
छत्रपती संभाजीनगर रोडवरील जय शंकर फेस्टिव्हल येथे अखिल भारतीय महानुभाव परिषदेच्या ३८ व्या अधिवेशनाचे उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते शनिवारी (दि. २५) झाले. यावेळी परिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष कारंजेकरबाबा यांनी महानुभाव परिषदेच्या मागण्या मुख्यमंत्र्यांसमोर मांडल्या.
महंत मोहनराज कारंजेकरबाबा म्हणाले की, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने महानुभाव पंथासाठी केलेले कार्य अत्यंत मोलाचे आणि ऐतिहासिक आहे. यासाठी या अधिवेशनात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अभिनंदनाचा ठराव करण्यात येत आहे. महानुभाव पंथ प्रवर्तक भगवान सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी अवतार दिन शासन स्तरावर साजरा करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला गेला. आता सर्व शासकीय कार्यालयांमध्ये अवतार दिन साजरा व्हावा. यासाठी अवतार दिनाला राज्य महोत्सवाचा दर्जा मिळावा, अशी मागणी कारंजेबाबा यांनी केली. महानुभाव पंथाची काशी श्रीक्षेत्र रिद्धपुरात जगातील पहिले मराठी भाषा विद्यापीठ सुरू झाले आहे. श्रीक्षेत्र रिद्धपूर विकासासह रेल्वेस्थानकाची निर्मिती केली आहे.
प्राचीन तीर्थस्थानांना जोडण्यासाठी 'सर्वज्ञ अष्टशताब्दी मार्गा'च्या पहिल्या टप्प्यात श्रीक्षेत्र डोमेग्राम परिसरातील स्थानांसाठी २३४ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे. तसेच आता श्रीक्षेत्र पैठण- श्रीक्षेत्र पांचाळेश्वर ते रामसगाव पर्यंतच्या (जि. जालना) दुसऱ्या टप्याकरिता २६१ कोटींचा डीपीआर प्रशासकीय मान्यतेसाठी मंत्रालयात सादर केला आहे. या प्रस्तावाला तत्काळ मंजुरी मिळावी, दिल्लीत प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात मराठी भाषा विद्यापीठाचा चित्ररथ सहभागी व्हावा, अशी मागणीही त्यांनी केली. याप्रसंगी महंत दर्यापूरकर बाबा, महंत लोणारकर बाबा, महंत सत्वराज बाबा, महंत सातारकर बाबा, महंत कृष्णराज बाबा पंजाबी, संतोष मुनी कपाटे, महंत राहेरकर बाबा, महंत खामणीकर बाबा, महंत मानेकर बाबा, महंत साळकर बाबा, सागर मुनी शास्त्री चिचोंडीकरबाबा, ॲड. झिंजुर्डे पाटील, सुभाष पावडे आदींनी आपले विचार मांडले.
ग्रंथ दिंडीने अधिवेशनाला सुरुवात
दोनदिवसीय सोहळ्यात शनिवारी (दि. २५) सकाळी ८.३० वाजता पालखी सोहळा व ग्रंथ दिंडी, ध्वजारोहण, अधिवेशनीय सभागृह व ग्रंथनगरीचे उद्घाटन, सकाळी १०. ते १२ उद्घाटन सत्र झाले. दुसऱ्या सत्रात महानुभाव मराठी साहित्य व साहित्यिकांच्या विचारांची मांडणी झाली.
सानपांची चूक अन् महाजनांची फुली!
माजी आमदार बाळासाहेब सानप यांनी प्रास्ताविकात जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्याऐवजी आमचे नेते छगन भुजबळ असा अनावधानाने उल्लेख केला. ही चूक काही क्षणांतच त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी आमचे नेते गिरीश महाजन अशी दुरुस्तीही केली. मात्र, सानप यांचे हे विधान महाजन यांच्या चांगलेच जिव्हारी लागले. सानप यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार झाल्यानंतर ते परतत असताना महाजन यांनी परिषदेचे अध्यक्ष कारंजेकर बाबा यांच्याशी अनौपचारिक संवाद साधत यामुळेच सानप यांच्यावर आपण फुली मारल्याचे इशारावजा सांगितले. हा सारा प्रकार व्यासपीठावर उघडपणे घडल्याने चर्चेला उधाण आले होते.