नाशिक : जिल्ह्यात अवकाळीने कहर मांडला असून रविवारी (दि. 11) दुपारी नाशिक शहर परिसरासह बागलाणवासियांना पावसाने चांगलेच झोडपून काढले. वादळवार्यांसह सुरु झालेल्या पावसामुळे दोन तासांत अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून पडले. वीजांचा कडकडट, ढगांचा गडगडाट आणि सोसाट्याचा वाऱ्यांळे दाणादाण उडाली होती.
जिल्हात तीन-चार दिवसांपासून अवकाळी पावसाची ये-जा सुरू आहे. यात आतापर्यंत 3 हजार 184 हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून कांदा, आंबा, टोमॅटो, भाजीपाला पिकांसह द्राक्षे, डाळींब या फळबागांचे नुकसान झाले आहे. रविवारी अवकाळी पावसाने यात भर पडली. कृषीमंत्री कोकाटे यांनी बाधित क्षेत्राचे त्वरीत पंचनामे करुन अहवाल सादर करण्याच्या सूचना अधिकार्यांना दिल्या आहेत. अवकाळीचा सर्वाधिक फटका सुरगाणा तालुक्यांला बसला. तालुक्यातील 141 गावे बाधित झाली आहेत. अनेक तालुक्यात गारपीट देखील झाल्याने नुकसानीचे प्रमाण वाढले आहे.
अवकाळीमुळे जिल्ह्यातील 795 हेक्टरवरील कांदा पिकांचे नुकसान झाले तर 332 हेक्टरवरील भाजीपाला कवडीमोल झाला आहे. 695 हेक्टरवरील फळबागांचे नुकसान झाले असून 524 हेक्टरवरील आंब्याच्या फळबागांचे नुकसान झाले आहे.
अवकाळीने कहर केल्याने अनेकठिकाणी वृक्ष उन्मळून पडले तर ग्रामीण भागात घरांवरील पत्रे उडाले. पेठ तालुक्यातील सर्वाधिक 101 घरांची पडझड झाली. त्याखालोखाल कळवण तालुक्यातील 59, बागलाण तालुक्यातील 22, मालेगाव तालुक्यातील 21 घरांचे नुकसान झाले आहे. त्याचप्रमाणे एक कांदाचाळ, दोन शाळा व एका प्राथमिक आरोग्य केंद्राचे नुकसान झाले आहे.
वादळी वारा आणि पावसामुळे सुरगाणा तालुक्यातील मोठामाळ परिसरातील भाऊराव सोमा पिठे यांच्या घराचे नुकसान झाले, तर मौजे खडकी दिगर येथील देवीदास सिताराम भोये यांचा वीजेच्या धक्क्याने मृत्यू झाला आहे.