

नाशिक : एप्रिल महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे अकरा तालुक्यांतील 62 गावे बाधित झाली असून 3,998 शेतकऱ्यांचे 2,151.64 हेक्टर क्षेत्रावरील शेतीपिकांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीसाठी 6 कोटी 6 लाख रुपयांच्या मदतीचा प्रस्ताव कृषी विभागाने दिला आहे.
शासननिर्णयानुसार नुकसानग्रस्त शेतकर्यांना भरपाई देण्यासाठी कृषी विभागाने प्रतिहेक्टर दर निश्चित केले आहेत. यासंदर्भात कृषी विभागाने अहवाल तयार करुन सहाय्यक कृषी सहसंचालकांना सादर केला आहे. एप्रिल महिन्यात दिंडोरी, नाशिक, चांदवड, निफाड, सिन्नर, मालेगाव, नांदगाव, बागलाण, कळवण, निफाड आणि येवला या ११ तालुक्यांना अवकाळीने झोडपले होते. वादळीवारे, अतिवृष्टीने पिकांसह फळबागांचे अतोनात नुकसान झाले होते. कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या आदेशानुसार पंचनामे झालेत. तालुका कृषी अधिकाऱ्यांनी शेतीपिकांच्या नुकसानीचा अहवाल कृषी विभागाच्या जिल्हा अधीक्षकांना सादर केला आहे.
नाशिक जिल्ह्याचे वातावरण फळपिकांसाठी पोषक असल्याने पारंपरिक शेतीसह शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात बागायती शेती उभी केली आहे. मात्र एप्रिल महिन्यात अवकाळीने शेतकर्याला आसमान दाखविले. जिल्ह्यातील 44 गावांमधील 3 हजार 737 शेतकर्यांची बागायती पिके नष्ट झालीत, तर 18 गावांमधील 261 शेतकर्यांची फळपिके अवकाळीने उजाडली. एप्रिलमध्ये बागायतीचे 1870 हेक्टर क्षेत्र, तर फळपिकांचे 280 हेक्टर क्षेत्र बाधित झाले. नुकसानग्रस्त शेतकर्यांना मदत करताना बागायती पिकांसाठी 5 कोटी 5 लाख, तर फळपिकांसाठी 1 कोटीचा निधी आवश्यक आहे. हा निधी शासनाकडून वर्ग होताच शेतकर्यांच्या खात्यावर भरपाई वर्ग करण्यात येणार आहे. सदर अहवालास जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी मंजुरी दिली आहे.
कोरडवाहू क्षेत्रासाठी 13 हजार 600, बागायत क्षेत्रासाठी 27 हजार, तर फळपिके क्षेत्रासाठी 36 हजार रुपये प्रति हेक्टर दर निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार नुकसानभरपाईसाठी एकूण 6 कोटींच्या निधीची आवश्यकता आहे.
दिंडोरी : जिल्ह्यात सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. या पार्श्वभूमीवर खासदार भास्कर भगरे यांनी पिंपळगाव बसवंत परिसरातील शेतकऱ्यांच्या बांधावर जात नुकसानीची पाहणी केली. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेत पिकांचे नुकसानीचे पंचनामे करत नुकसानभरपाई देण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात व दिंडोरी लोकसभा मतदारसंघात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस सुरू आहे. शेतकऱ्यांचे कांदा, टोमॅटो, आंबा, कोबी, फ्लॉवर, कोथिंबीर व इतर भाजीपाला या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तसेच शेतकऱ्यांनी शेतात काढून ठेवलेल्या कांद्याचे व खळ्यांवर साठविण्याकरिता आणलेला कांदा व इतर शेतमालाचे प्रचंड नुकसान झाले आहे. अनेक वृक्ष उन्मळून पडले आहेत, तसेच विजेचे खांब कोसळले आहेत, त्याचप्रमाणे घरांचे व गोदामांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी, व्यापारीवर्ग आर्थिक संकटात सापडला आहे. तरी त्वरित नुकसानग्रस्त भागातील पिकांचे व इतर सर्व नुकसानीचे पंचनामे करून आर्थिक मदत मिळणेकामी योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी त्यांनी निवेदनात केली आहे.