

नाशिक : अवकाळीचा फेरा सुरूच असून सोमवारी जिल्ह्याच्या बहुतांशी भागात वादळीवाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. निफाड तालुक्यात मौजे सुकेणे येथे वीज अंगावर पडून शेतकरी दिपक रंगनाथ रहाणे (40) ठार झाले तर नाशिक तालुक्यात जातेगाव येथे बारावर्षीय आदित्य राजाराम वळवे या मुलाच्या अंगावर वीज कोसळल्याने तो गंभीर जखमी झाला. येवल्यात विवाहितेच्या अंगावर होडिंग पडल्याने गंभीर जखमी झाली आहे.
दिंडोरी तालुक्यातही अवकाळीने थैमान घातले. वादळवार्यांसह जोरदार पावसामुळे सप्तश्रृंगी गडाकडे जाणार्या रस्त्यावर दगड कोसळल्याने चारचाकी वाहनाचे नुकसान झाले. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही. चांदवडला पावसाचा धुमाकूळ सुरु आहे. वडगाव पंगू येथे पोल्ट्री फार्मवर सोमवारी वीज कोसळी. या दुर्घटेत सुमारे 2 हजार कोंबड्या मयत झाल्या आहेत.
दरम्यान अवकाळीमुळे आठवड्यापासून जिल्ह्यात विविध भागांत मनुष्यहानीच्या घटूल घडत आहेत. सिन्नर तालुक्यातील मौजे नळवाडी येथे शुक्रवारी (दि.16) शेतकरी रामदास दगडू सहाणे (35) हे वादळीवार्यासह आलेल्या तीव्र पावसात शेतातून घरी जात असतांना वीजेचा शॉक लागून विहीरीत पडून मयत झाले.
सिन्नर तालुक्यातील मौजे मापारवाडी येथे शुक्रवारी (दि.16) विकास रामनाथ बर्डे हा बारा वर्षाचा मुलगा सायंकाळी सव्वापाचच्या दरम्यान वीज पडून मयत झाला तर इगतपुरी तालुक्यातील मौजे पारदेवी येथे लालचंद देवराम सदगीर (वय 50) हे शुक्रवारी (दि.16) शेतात म्हैस चारत असतांना अंगावर वीज पडल्याने जखमी झाले नाशिक येथे जिल्हा रुग्णालयात ते पुढील उपचारासाठी दाखल झाले आहेत.