

नाशिक : सलग चौथ्या दिवशी शहरात विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस बरसला. रविवारी (दि. ११) दुपारी २ वाजता पावसाने हजेरी लावत, झोडपून काढले. वादळी वाऱ्यामुळे शेकडो वृक्ष उन्मळून पडली. घरांवरील पत्रे उडाले. अनेक भिंती पडल्याने एकच गोंधळ उडाल्याचे चित्र दिसून आले. याशिवाय शेतीचेही मोठे नुकसान झाले.
नाशिकमध्ये भर दुपारी अचानक पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांची धावपळ उडाली. रस्त्यांवर पाणी साचले तर झाडे पडल्याने वाहतूक खोळंबली. झोपडपट्टीतील घरांचे पत्रे उडून अनेकांचे संसार उघड्यावर आले. काही भागांत सोलर पॅनल उडाले, तर सातपूर व औद्योगिक वसाहतीतील कारखान्यांच्या संरक्षक भिंती कोसळल्या. अनेक भागात झाडे पडल्याच्या तक्रारी अग्निशमन दलाकडे प्राप्त झाल्या होत्या. रात्री उशिरापर्यंत झाडे हटविण्याची कामे सुरू होती.
दरम्यान, हवामान विभागाने सोमवारपर्यंत (दि. १२) नाशिकला यलो अलर्ट दिल्याने, पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे. मध्य प्रदेशापासून मराठवाडा, तेलंगणा ते दक्षिण कर्नाटकपर्यंत हवेचा दक्षिणोत्तर कमी दाबाचा पट्टा सक्रीय झाल्याने, राज्यातील विविध भागात वादळी वाऱ्यासह पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
नाशिक जिल्ह्यातील निफाड, देवळा, चांदवड, येवला, नांदगाव आणि अन्य तालुक्यांत अवकाळी पावसामुळे कांदा व फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. खरीप हंगामाच्या शेवटच्या टप्प्यात कांदा काढणी प्रभावित झाली आहे. हवामान विभागाने सोमवारपर्यंत यलो अलर्ट जारी करत शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
अचानक सुरू झालेल्या पावसामुळे वाहतुकीचा मोठा खोळंबा झाल्याचे दिसून आले. वादळी वाऱ्यासह बरसणाऱ्या पावसामुळे एकच तारांबळ उडाली होती. पावसाचा वेग इतका होता की, रस्त्यावरील काहीही दिसून येत नव्हते. धूळ, पाऊस आणि वारे असे चित्र असल्याने, वाहनधारकांनी वाहने रस्त्याच्या कळेला थांबविणे पसंत केले. तब्बल तासभर पाऊस कोसळल्याने, अनेकांची पंचाईत झाली.