नाशिक : जिल्हा परिषदेत दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे नोकरी मिळविताना किंवा बदली करताना सादर केलेल्या दिव्यांग प्रमाणपत्राची तपासणी करण्याचे आदेश दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांनी दिले होते. त्यानुसार, विविध विभागातंर्गत असलेल्या ६१४ कर्मचाऱ्यांच्या अद्वितीय अपंगत्व ओळखपत्र (यूडीआयडी) मागविला. यापुढे जात मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी या दिव्यांग प्रमाणपत्राची फेरपडताळणी करण्याचा निर्णय घेतला आहे. सदर पडताळणी ही जिल्ह्याबाहेरील रूग्णालयात केली जाणार आहे. पडताळणीच्या या निर्णयाने दिव्यांग कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.
दिव्यांग कल्याण विभागाच्या सचिवपदाची धुरा हाती घेतल्यानंतर, मुंढे यांनी राज्यातील सर्व जिल्हा परिषदांना पत्र देत दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या प्रमाणपत्राची तपासणी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार जिल्हा परिषद प्रशासनाने विभागांना पत्र काढत, प्रमाणपत्र तपासणी करून (युडीआयडी नंबर) अहवाल मागविले. जिल्हा परिषद अतंर्गत विविध विभागांमध्ये एकूण ६१४ व्यक्तींनी दिव्यांग प्रमाणपत्र सादर करत लाभ घेतला आहे. त्यातील पाच कर्मचाऱ्यांकडे 'यूडीआयडी' उपलब्ध नसल्याचे निर्देशनास आले.
सामान्य प्रशासन, शिक्षण व आरोग्य विभागातील प्रत्येकी एक व दोन ग्रामसेवकांकडे हे कार्ड नसल्याने त्यांची खातेंतर्गत चौकशी करण्यात येणार आहे. यातील काही व्यक्तींनी 'यूडीआयडी'साठी अर्ज सादर केल्याचे सांगण्यात येते. या व्यतिरीक्त ज्या अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांनी दिव्यांग प्रमाणपत्र 'यूडीआयडी' सादर केला आहे. असे असताना ६१४ कर्मचाऱ्यांच्या प्रमाणपत्राची (युडीआयडी नंबर) फेरपडताळणी करण्याचे निर्देश पवार यांनी प्रशासनाला दिले आहे. काही कर्मचाऱ्यांनी जिल्हा रूग्णालयातून तर, काहींनी धुळे येथील रूग्णालयातून हे प्रमाणपत्र मिळविलेले आहेत. त्यामुळे या सर्व प्रमाणपत्रांची इतर जिल्हयातील शासकीय मान्यताप्राप्त रूग्णालयातून फेर पडताळणी करून घेण्यात येणार आहे. फेर पडताळणी करण्याची जबाबदारी ही समाजकल्याण अधिकारी हर्षदा बडगुजर यांच्यावर सोपविली आहे. त्या अनुषगांने त्यांनी पहिल्या टप्यात 98 बहिरेपणा प्रमाणपत्र सादर केलेल्या कर्मचाऱ्यांच्या प्रमाणपत्राची प़डताळणी करणाची कार्यवाही सुरू केली आहे.
बदल्या अडचणीत येणार
जिल्हा परिषदेच्या अतंर्गत बदली प्रक्रीया राबवितांनाही काही कर्मचाऱ्यांनी दिव्यांग प्रमाणपत्र सादर करत, बदल्या करून घेतलेल्या आहेत. काही कर्मचारी या प्रमाणपत्राचा आधार घेऊन मुख्यालयात ठाण मांडून आहेत. त्यामुळे या सर्व कर्मचाऱ्यांच्या प्रमाणपत्राची पडताळणी होणार असल्याने कर्मचारी वर्गाचा जीव टांगणीला लागला आहे.