

नाशिक : सुधाकर बडगुजर, विलास शिंदेंपाठोपाठ सुनील बागूल, मामा ठाकरे यांसारखे शिलेदार निसटल्याने हतबल झालेल्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला नवी उभारी देण्यासाठी खुद्द उद्धव ठाकरे मैदानात उतरले आहेत.
उद्धव ठाकरे जुलैअखेर नाशिकच्या दोनदिवसीय दौऱ्यावर येत आहेत. आगामी महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्या निवडणुकांसाठी राजकीय व्यूहरचना ठाकरे यांच्या या दौऱ्यात निश्चित केली जाणार आहे. दरम्यान, पक्षप्रमुखांच्या या दौऱ्याच्या तयारीसाठी मंगळवारी (दि. १५) दुपारी ४ वाजता शालिमार येथील पक्ष कार्यालयात पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे.
उपनेते सुधाकर बडगुजर, महानगरप्रमुख विलास शिंदे यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर उपनेते सुनील बागूल, मामा ठाकरे यांनीदेखील भाजपची वाट धरल्याने नाशिकमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची पुरती वाताहात झाली आहे. आगामी महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकांपूर्वी उबाठाला जमीनदोस्त करण्याची गर्जना जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी केली होती. नाशिकमधील उरल्यासुरल्या उबाठाला सुरूंग लावून महाजन यांनी महिनाभरातच आपला शब्द खरा केला. त्यामुळे उबाठाला मोठा धक्का बसला आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाला या संकटातून बाहेर काढण्यासाठी ठाकरे यांनी आपले शिलेदार पाठवत डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न केला. परंतु त्यात यश मिळाले नाही. त्यामुळे आता खुद्द उद्धव ठाकरे मैदानात उतरले असून, जुलैअखेर अथवा आॉगस्टच्या पहिल्या आठवड्यात ते नाशिक दौऱ्यावर येत आहेत.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या २७ जुलै रोजी होऊ घातलेल्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण नाशिक जिल्ह्यात भगवा सप्ताह साजरा केला जाणार आहे. तसेच लवकरच ते दोन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाची व दौऱ्याची रूपरेषा ठरविण्यासाठी मंगळवारी (दि. १५) दुपारी ४ वाजता शालिमार येथील पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आल्याची माहिती जिल्हाप्रमुख डी. जी. सूर्यवंशी, महानगरप्रमुख प्रथमेश गिते यांनी दिली. या बैठकीस जिल्ह्यातील सर्व पक्ष पदाधिकाऱ्यांना निमंत्रित करण्यात आले आहे.