Nashik Simhastha Kumbh Mela | सिंहस्थ कुंभमेळा टेंडर घोटाळा; बनावट वर्कऑर्डर प्रकरणी जामनेरच्या दोघांना बेड्या!

Nashik Simhastha Kumbh Mela | सिंहस्थ कामांच्या टेंडर मंजुरीसाठी तीन कोटींचा गंडा, शहर आयुक्तालयात तीन गुन्हे दाखल
Arrested
ArrestedPudhari
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिक-त्र्यंबकेश्वरमध्ये २०२७-२८ मध्ये होत असलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या विविध कामांचे टेंडर मंजूर करून देतो, असे सांगत बनावट कागदपत्रांआधारे कोट्यवधींची आर्थिक फसवणूक करणाऱ्या दोघांना गुन्हे शाखा युनिट-१ च्या पथकाने जेरबंद केले. शेख अहमद सलीमुद्दीन शेख (वय ३२, रा. घर नं. २३७/१, पाचोरा रोड, प्रियंका पॅलेससमोर, जामनेर) आणि नरेंद्र तोताराम महाजन (वय ५९, रा. नवसरा, सोने-चांदीच्या दुकानाजवळ, देशमुख गल्ली, जामनेर) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. संशयितांनी फिर्यादीकडून तब्बल तीन कोटी रुपये बँक खात्यावर घेतल्याचे तपासात समोर आले आहे.

Arrested
Nashik Farmer Loan | शेतकरी कर्जमाफीनंतरही नाशिक जिल्हा बँकेची कोंडी कायम; अपेक्षित निधी न मिळाल्याने पेच!

आधीही बनावट ऑर्डरचा गुन्हा दाखल

विशेष म्हणजे, यापूर्वी बनावट वर्कऑर्डर तयार केल्याप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात स्वतंत्र गुन्हा दाखल झालेला आहे. मात्र, सद्यस्थितीत त्या गुन्ह्याचा आणि सिंहस्थाच्या टेंडर फसवणूक प्रकरणाचा थेट संबंध दिसून येत नसल्याचे पोलिस यंत्रणेकडून सांगण्यात आले आहे. तरीही दोन्ही प्रकरणांमध्ये वापरण्यात आलेल्या कागदपत्रांची पद्धत, संगणकावर तयार केलेल्या वर्कऑर्डर, आर्थिक व्यवहार आणि संशयितांची भूमिका याबाबत सखोल तपास सुरू आहे.

बनावट वर्कऑर्डर तयार करण्यासाठी संशयितांना अन्य कोणी मदत केली होती का, संगणकावर ही कागदपत्रे नेमकी कुठे आणि कोणाच्या मदतीने तयार करण्यात आली, तसेच या पद्धतीने अन्य व्यक्तींचीही फसवणूक झाली आहे का, याचा शोध घेतला जात आहे.

सिंहस्थ कुंभमेळ्यासाठीच्या विविध विकासकामांची बजेट यादी, शासनाची राजमुद्रा असलेली कागदपत्रे तसेच टेंडर प्रक्रियेशी संबंधित कागदपत्रे दाखवून संशयितांनी फिर्यादीचा विश्वास संपादन केला. नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाच्या नावाचा बनावट टेंडर नोटीस क्रमांक दाखवून हाऊसकीपिंगचे काम मिळवून देण्याचे आमिष दाखवण्यात आले. सिंहस्थाच्या मोठ्या प्रकल्पांमध्ये काम मिळाल्यास मोठा आर्थिक फायदा होईल, असे सांगून फिर्यादीला या व्यवहारात गुंतवण्यात आले.

संशयितांनी संगणकाआधारे हुबेहूब वर्कऑर्डर तयार केल्या होत्या. अधिकृत सरकारी कार्यालयातूनच वर्कऑर्डर जारी करण्यात आल्याचा आभास निर्माण होईल, अशा पद्धतीने कागदपत्रांची रचना केली. शासनाची राजमुद्रा, टेंडरशी संबंधित तपशील, क्रमांक आणि इतर माहितीचा वापर करून ही कागदपत्रे तयार करण्यात आल्याने फिर्यादीला या कागदपत्रांबाबत संशय आला नाही.

Arrested
Nashik Municipal Corporation | नाशिक महापालिकेतील 123 कंत्राटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; कायम सेवेचा मार्ग मोकळा!

वर्कऑर्डर मिळवून देण्यासाठी तसेच टेंडर प्रक्रियेतील विविध कामांसाठी पैसे भरावे लागतील, असे सांगून संशयितांनी फिर्यादीकडून वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये रक्कम घेतली. ही रक्कम संशयितांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आली. तपासात आतापर्यंत फिर्यादीकडून एकूण तीन कोटी पाच लाख रुपये बँक खात्यावर घेतल्याचे समोर आले आहे.

मात्र, प्रत्यक्षात कोणतेही अधिकृत काम किंवा टेंडर मिळाले नाही. त्यामुळे फिर्यादीला संशय आल्याने संबंधित कागदपत्रांची पडताळणी केली असता ती बनावट असल्याचे उघड झाले. या प्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, पोलिस उपायुक्त (गुन्हे) किरणकुमार चव्हाण आणि सहायक पोलिस आयुक्त (गुन्हे) संदीप मिटके यांनी संशयितांचा तातडीने शोध घेण्याच्या सूचना दिल्या. गुन्हे शाखा युनिट-१ आणि गुंडाविरोधी पथकाने तांत्रिक विश्लेषण, बँक व्यवहार, मोबाईल लोकेशन आधारे तपास केला.

पोलिस निरीक्षक डॉ. अंचल मुद्गल यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने जामनेर परिसरात तपासाची चक्रे फिरवून शेख अहमद सलीमुद्दीन शेख आणि नरेंद्र तोताराम महाजन यांना ताब्यात घेतले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news