

त्र्यंबकेश्वर : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी त्र्यंबक तालुक्यातील जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गण यांची प्रारूप प्रभागरचना अधिसूचना जाहीर झाली आहे.
त्र्यंबक येथील तहसील कार्यालयात नागरिकांच्या अवलोकनासाठी गट आणि गण यांची प्रारूप रचना सूचना लावण्यात आली आहे. यात फेब्रुवारी २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीप्रमाणेच रचना कायम राहिली आहे. जि. प.चे ३, तर पंचायत समितीचे ६ गण यावेळीदेखील कायम आहेत.
त्र्यंबक पंचायत समितीची निर्मिती झाली तेव्हा म्हणजेच २००२ पासून गण-गटरचना यावेळीही कायम राहिली आहे. जिल्हा परिषदेसाठी अंजनेरी, हरसूल आणि ठाणापाडा गट, तर पंचायत समितीसाठी अंजनेरी, देवगाव, वाघेरा, हरसूल, ठाणापाडा व ओझरखेड असे सहा गण आहेत. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये अलीकडच्या कालावधीत बदललेल्या राजकीय समीकरणांचा प्रभाव जाणवणार आहे. २०१७ नंतर बरीच मोठी राजकीय उलथापालथ झाली आहे.
संपूर्ण तालुक्यात वर्चस्व असलेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातून झालेले आउटगोइंग निवडणुकीत प्रखरतेने जाणवणार आहे. माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष संपतराव सकाळे हे राष्ट्रवादीत प्रवेश करत प्रदेश उपाध्यक्ष झाले आहेत. पूर्वी काँग्रेसचे असलेले आमदार हिरामण खोसकर आता राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावर निवडून आले आहेत. दोन पंचवार्षिक आमदार असलेल्या निर्मला गावित यांनी काँग्रेस सोडून आता त्या शिंदे गटाच्या शिवसेनेत आहेत. मागच्या काही दिवसांत शिवसेनेचे काही पदाधिकारी भाजपात, तर काही राष्ट्रवादीत गेले आहेत. भाजपाला २० वर्षांत एकही जागा मिळवता आलेली नव्हती.
मात्र, महायुतीच्या माध्यमातून यावेळी तालुक्याच्या राजकारणात शिरकाव करण्याची संधी मिळेल. या आशेवर वरिष्ठ पदाधिकारी असल्याचे दिसून येते. आजघडीला तालुक्यात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाकडे मातब्बर मंडळी जमा झालेली दिसते. प्रस्थापित पक्षांची अशी पडझड झालेली असताना माकपने मात्र आपली पकड सोडलेली नाही. तालुक्यात ठाणापाडा भागात असलेले माकपचे वर्चस्व आजही कायम आहे.