Trimbakeshwar Temple | सलग सुट्ट्यांमुळे त्र्यंबकनगरी गजबजली

दोनशे रुपयांची दर्शनबारी पोहोचली जून्या बस स्थानकापर्यंत
Trimbakeshwar Temple
सलग सुट्ट्यांमुळे त्र्यंबकनगरी गजबजलीpudhari photo
Published on
Updated on

त्र्यंबकेश्वर : सलग सुट्ट्यांची पर्वणी आल्याने त्र्यंबकेश्वर येथे भक्तांची गर्दी उसळल्याचे दिसून आले. शुक्रवारी (दि. १६) दोनशे रुपये दर्शन बारीची रांग थेट जुन्या बस स्थानकाच्या प्रवेशद्वारापर्यंत पोहोचली होती. तिसऱ्या सोमवार करिता शासन यंत्रणांचे बैठकांचे सत्र सुरू आहे. मात्र असुविधा कायम असल्याने भक्तांची सत्वपरीक्षा पूर्वीप्रमाणे कायम आहे असे स्पष्ट चित्र आज त्र्यंबकनगरीत दिसून येत आहे.

त्र्यंबकेश्वर मंदिराचे जवळ असलेल्या शिवनेरी धर्मशाळेपासून वाढत गेलेली पेड दर्शनबारी रांग उपजिल्हा रुग्णालय व तेथून डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक ते थेट जुने बसस्थानक अशी लांबत गेल्याने भाविकांना यानिमित्ताने संपूर्ण त्र्यंबकेश्वर नगरीचे दर्शन घडले. विशेष म्हणजे, त्या तुलनेत मोफत दर्शन असलेल्या पूर्व दरवाजा दर्शनबारीत गर्दी कमी होती. भाविकांना विना अडथळा दर्शन घेता यावे यासाठी बैठका घेतल्या जातात, मात्र भाविकांची परवड काही थांबलेली दिसत नाही

Trimbakeshwar Temple
Shravan 2024 : यंदाच्या श्रावण महिन्यात ५ सोमवार! ७२ वर्षानंतर दुर्मिळ योगायोग!

त्र्यंबकेश्वर मंदिरात दुपारी बारा वाजेच्या सुमारास माध्यान्ह पूजेच्या दरम्यान नैवद्यासाठी काही वेळ गर्भगृह दरवाजा बंद असतो. नेमके त्याच वेळेस भाविकांचा ओघ वाढलेला असतो. दरवाजा बंद करण्याची वेळ आणि कालावधी अनिश्चीत असल्याने यावेळात रांगेतील भाविक एकाच जागेवर अर्धा पाऊण तास थांबलेला असतो. अनेकदा भाविक रांगेतून बाहेर पडतात व परतीचा मार्ग धरतात.

त्र्यंबकेश्वर बस स्थानक संत गजानन महाराज संस्थान समोर असलेल्या सिंहस्थ बस स्थानकात हलवले आहे. तशात मागच्या काही दिवसांपासून ठाणे, बदलापूर, मुरबाड भागातील नेते मंडळी दररोज 80 ते 100 खासगी बसने त्यांच्या मतदार संघातील महिलांना देवदर्शन घडवत आहेत. त्यांच्यासाठी बस स्थानकाच्या बाजूला असलेल्या जागेत थांबण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. हजारो भाविक प्रवासी शहराबाहेरच्या या थांब्यापासून एक किलोमीटर अंतर पायपीट करत मंदिराकडे येत आहेत. तथापि, बाहेर गावच्या वाहनांना अडवण्यासाठी येथे बॅरेकेटींग करत भाविकांना आत जाण्यासाठी रस्ता ठेवलेला नाही. त्यामुळे रस्ता शोधत जमेल तसे भाविक जाणे येणे करत असल्याने येथे वारंवार कोंडी निर्माण होत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news