Trimbakeshwar Temple | त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाबाबत महत्त्वाची बातमी; भाविकांची चिंता वाढणार?

Trimbakeshwar Temple | सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी त्र्यंबकेश्वर मंदिरात मोठा बदल; नियमित दर्शन स्थगित ठेवण्याची मागणी
Trimbakeshwar Temple
Trimbakeshwar Temple Pudhari File Photo
Published on: 
Updated on: 

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर येथे सुरू असलेल्या स्वतंत्र दर्शन मार्गाच्या कामामुळे आता भाविकांच्या दर्शनव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. बांधकामादरम्यान भाविकांची सुरक्षितता राखणे आणि काम निर्धारित वेळेत पूर्ण करणे शक्य व्हावे, यासाठी श्री त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरातील नियमित दर्शन तब्बल अडीच महिन्यांसाठी बंद ठेवण्याचा प्रस्ताव पुढे आला आहे.

Trimbakeshwar Temple
Nashik Property Tax | नाशिक महापालिकेला कर्मचारी टंचाईचा फटका; मालमत्ता कराच्या मागणीत 15 कोटींची घट

महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाने (एमएसआयडीसी) याबाबत जिल्हा प्रशासन आणि कुंभमेळा प्राधिकरणाकडे निर्णय घेण्याबाबत विनंती केली आहे. सिंहस्थापूर्वी त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकांसाठी स्वतंत्र प्रवेशमार्ग आणि दर्शन रांग उभारण्याचे काम एमएसआयडीसीमार्फत करण्यात येत आहे.

कंत्राटदाराने प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली असून, कामासाठी उपलब्ध असलेला कालावधी कमी असल्यामुळे दररोज दोन शिफ्टमध्ये काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार काम सुरू आहे. मात्र, मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावर भाविकांची मोठी गर्दी असते. याच मार्गावरून बांधकाम साहित्य आणि अवजड यंत्रसामग्रीची वाहतूक करावी लागत आहे.

गर्दीतून यंत्रांची ने-आण करताना भाविकांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होऊ शकतो. तसेच गर्दीमुळे साहित्य वाहतुकीत अडथळे येऊन कामाचा वेग मंदावण्याची शक्यता आहे. ही परिस्थिती लक्षात घेता, काम पूर्ण होईपर्यंत मंदिरातील नियमित, सशुल्क आणि विशेष दर्शन अडीच महिन्यांसाठी स्थगित ठेवण्याचा पर्याय एमएसआयडीसीने मांडला आहे. यासंदर्भात जिल्हा प्रशासन, कुंभमेळा प्राधिकरण, पोलिस दल आणि संबंधित यंत्रणांनी संयुक्त पाहणी करून लेखी निर्णय घ्यावा, अशी मागणी महामंडळाने केली आहे.

नित्यपूजा अखंडित सुरू राहणार

दर्शन स्थगित असले, तरी मंदिरातील नित्यपूजा अखंड सुरू ठेवण्याची सूचना करण्यात आली आहे. देवस्थानने नियुक्त केलेल्या पुरोहितांनाच सुरक्षित मार्गाने मंदिरात प्रवेश देण्याचा प्रस्ताव आहे. काम पूर्ण झाल्यानंतर प्रवेशमार्ग आणि आपत्कालीन मार्ग सुरक्षित असल्याची खात्री करून भाविकांसाठी दर्शन पुन्हा सुरू करण्याची भूमिका एमएसआयडीसीने मांडली आहे.

Trimbakeshwar Temple
Nashik Trimbakeshwar Road Traffic Diversion| नाशिक - त्र्यंबकेश्वर मार्गात चार दिवसांसाठी बदल

अद्याप अंतिम निर्णय नाही

  • अडीच महिन्यांसाठी दर्शन स्थगित ठेवण्याची एमएसआयडीसीची विनंती.

  • नियमित, सशुल्क आणि विशेष दर्शन बंद ठेवण्याचा प्रस्ताव.

  • मंदिरातील नित्यपूजा मात्र सुरू राहणार.

  • नियुक्त पुरोहितांना सुरक्षित मार्गाने प्रवेश देण्याची सूचना.

  • जिल्हा प्रशासन, कुंभमेळा प्राधिकरण आणि पोलिसांच्या संयुक्त पाहणीनंतर निर्णय अपेक्षित.

  • दर्शन पुन्हा सुरू करण्यापूर्वी प्रवेशमार्ग आणि आपत्कालीन मार्गाची सुरक्षितता तपासली जाणार.

जिल्हा प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष

बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिरातील दर्शन अडीच महिने बंद ठेवण्याचा प्रस्ताव समोर आल्यामुळे भाविकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. धार्मिक परंपरा, भाविकांची गैरसोय आणि बांधकामाची गरज या तिन्ही बाबींचा विचार करून प्रशासनाला निर्णय घ्यावा लागणार आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन आणि कुंभमेळा प्राधिकरणाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.