

त्र्यंबकेश्वर (नाशिक) : त्र्यंबकेश्वर मंदिरात यंदाच्या पावसाळ्यात काही ठिकाणी गळती सुरू झाली असून, पावसाचे पाणी झिरपत असल्याचे दिसून येत आहे. काही वर्षांपूर्वी पुरातत्व विभागाच्या वतीने मंदिराची डागडुजी करण्यात आली होती. मात्र, सध्याच्या गळतीमुळे डागडुजीचे काम अपुरे ठरल्याचे स्पष्ट झाले आहे.
मंदिर प्रशासनाने याबाबत पुरातत्व विभागाशी संपर्क साधला आहे. विशेष म्हणजे, गळतीमुळे सभामंडपात गर्भगृह दर्शनासाठी लावलेला एलईडी स्क्रीन बंद पडला आहे. श्रावण महिन्याच्या पार्श्वभूमीवर सध्या मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होत असून, गर्भगृहात थांबण्याची वेळ मर्यादित असल्यामुळे भाविकांसाठी एलईडी स्क्रीनची सुविधा उपयुक्त ठरत होती. मात्र, पावसामुळे निर्माण झालेल्या गळतीमुळे ती सुविधा तात्पुरती बंद ठेवावी लागली आहे. त्यामुळे भाविकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
पावसाचा जोर वाढताच त्र्यंबकेश्वर मंदिराच्या सभामंडपात जागोजागी पाणी झिरपू लागते. त्यामुळे सभामंडपात बसण्यास जागा राहत नाही. या गळतीमुळे सीसीटीव्ही कॅमेरे व स्विच बोर्ड यांसारखी यंत्रणा निकामी झाली आहे. जाणकारांच्या मते, मागील वर्षी मंदिराच्या आतील भागात करण्यात आलेल्या पॉलिशमुळे ही गळती अधिकच वाढली असण्याची शक्यता आहे.