

त्र्यंबकेश्वर (नाशिक) : आगामी सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबक नगरपरिषदेकडून सोमवारी (दि. १८) प्रारूप प्रभागरचना जाहीर करण्यात आली. सन २०११ च्या जनगणनेतील आकडेवारी आणि प्रगणकांनी केलेल्या सर्वेक्षणाच्या आधारे ही प्रभागरचना ठरविण्यात आली आहे. यापूर्वी नगरपरिषदेचे १७ सदस्य होते. आगामी कार्यकाळात सदस्यसंख्या वाढून ती २० इतकी होणार आहे. त्यासाठी १० द्विसदस्यीय प्रभाग निश्चित करण्यात आले असल्याची माहिती प्रशासक तथा मुख्याधिकारी डॉ. श्रीया देवचके यांनी ही माहिती दिली.
शहराची एकूण १३ हजार २८३ इतकी लोकसंख्या या १० प्रभागांमध्ये विभागली गेली आहे. जूलै २०२५ मध्ये तयार करण्यात आलेल्या मतदारयादी प्रमाणे शहरातील मतदार संख्या १२ हजार ९४१ आहे. नागरिकांना या प्रारूप प्रभाग रचनेवर येत्या ३१ ऑगस्टपर्यंत हरकती व सुचना लेखी स्वरूपात नोंदवता येणार आहेत. नगर परिषद कार्यालयात प्रारूप प्रभाग रचना पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.