

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
आश्रमशाळांमधील दुरवस्थेवरून सातत्याने टीका होत असतानाच आदिवासी विकासमंत्री प्रा. डॉ. अशोक उईके यांनी गुरुवारी दिंडोरी तालुक्यातील जोपूळ येथील आश्रमशाळेवर मारलेली 'सरप्राइज व्हिजिट' शिक्षण आणि आदिवासी विकास प्रशासनासाठी मोठा हादरा ठरली आहे.
जनावरांच्या गोठ्यालाही लाजवेल अशी किचनची झालेली अवस्था आणि अंगावर काटा आणणारी विद्यार्थ्यांची हेळसांड पाहून भडकलेल्या मंत्री प्रा. उईके यांनी ऑन-द-स्पॉट कारवाई करत या आश्रमशाळेची मान्यताच रद्द करण्याचे आदेश दिले.
दोन दिवसांपासून नाशिक दौऱ्यावर असलेल्या प्रा. उईके यांनी बोपेगाव आणि माणी येथील शाळांची पाहणी करत 'विद्यार्थ्यांच्या सुरंशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही' असा इशारा दिला होता.
जोपूळला विद्यार्थ्यांना जमिनीवर झोपवणाऱ्या व्यवस्थापनाची मंत्र्यांनी कडक शब्दांत हजेरी घेतली. 'हा आश्रमशाळा चालवण्याचा प्रकार आहे की विद्यार्थ्यांचा छळ' असा थेट प्रश्न विचारत सर्व विद्यार्थ्यांचे दुसऱ्या शाळेत समायोजन करण्याचे फर्मान त्यांनी जारी केले.
विशेष म्हणजे, याच आश्रमशाळेत ऑगस्टमध्ये दहावीच्या एका विद्यार्थ्याने आत्महत्या केली होती. याप्रकरणी मुख्याध्यापक आणि अधीक्षकांसह पाच जणांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा आधीच दाखल आहे.
आदिवासी संघटनेचे प्रभाकर कसाळे व विकी मुंजे यांनी या घटनेत मृतदेहाची झालेली अवहेलना मंत्र्यांसमोर मांडताच वातावरणात संताप पसरला. प्रभारी आयुक्त गोपीचंद कदम, अप्पर आयुक्त दिनकर पावरा, प्रकल्प संचालक अर्पिता ठुबे यांच्यासमक्ष मंत्र्यांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.