नांदगाव : पुढारी वृत्तसेवा
तालुक्यातील जळगाव बुद्रुक येथे १६ वर्षे ११ महिन्यांच्या अल्पवयीन मुलीचा विवाह लावून देण्याचा प्रयत्न झाल्याची घटना स्वातंत्र्यदिनी १५ ऑगस्ट रोजी समोर आली. आदिवासी कार्यकर्त्यांना मुलगी अल्पवयीन असल्याची माहिती मिळताच त्यांनी विवाहस्थळी धाव घेत विवाह थांबविला.
पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार, मुलीचा विवाह जळगाव बुद्रुक (ता. नांदगाव) येथील २७ वर्षीय तरुणासोबत ठरविला होता. मुलगी अल्पवयीन असल्याची माहिती तिच्या आई-वडिलांसह वरपक्षातील संबंधितांना असल्याचा आरोप फिर्यादीत केला आहे.
विवाहासाठी वरपक्षाकडून मुलीच्या आई-वडिलांना ५० हजार रुपये दिल्याचे तसेच विवाह जुळवून देणाऱ्या मध्यस्थ महिलेलाही ५० हजार रुपये दिल्याचे मुलीने फिर्यादीत नमूद केले आहे.
१५ ऑगस्ट रोजी सकाळी मुलगी, तिचे आई-वडील, नातेवाईक आणि इतर नागरिक विवाहस्थळी गेले होते.
दुपारी सुमारे दीडला सामाजिक कार्यकर्त्या जयश्री डोळे यांच्यासह मधुकर गावंडे, रोहिदास भुमारे, ज्ञानेश्वर सोनवणे, तानाजी वर्डे यांच्यासह नांदगाव तालुक्यातील आदिवासी कार्यकर्ते, नागरिक विवाहस्थळी पोहोचले व मुलगी अल्पवयीन असल्याचे समोर आल्याने त्यांनी सुरू असलेला बालविवाह रोखण्यासाठी पुढाकार घेतला. काही वेळाने पोलिस अधिकारी व अंमलदार घटनास्थळी पोहोचले आणि मुलगी, तिचे आई-वडील तसेच संबंधित व्यक्तींना नांदगाव पोलिस ठाण्यात आणले.
मुलीची जन्मतारीख २६ ऑगस्ट २००९ असून, १५ ऑगस्ट २०२६ रोजी तिचे वय १६ वर्षे ११ महिने २० दिवस असल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या प्रकरणी मुलीच्या फिर्यादीवरून तिचे आई-वडील, वरपक्षातील संबंधित व्यक्ती, वर आणि विवाह जुळवून देणाऱ्या मध्यस्थ महिलेसह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून, पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक यशवंत सोळसे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक सतीश गावित करीत आहेत.