

नाशिक : सोने सध्या सर्वकालीन उच्चांकावर असून, बाजारातील सततच्या चढउताराच्या स्थितीमुळे मिनिटागणिक दरवाढीचे नवे विक्रम स्थापित करीत आहे. मंगळवारी (दि. 11) जेव्हा बाजार उघडला तेव्हा सोने थेट 89 हजारांच्या नजीक पोहोचले.
मंगळवारी (दि. 11) दुपारी 1 पर्यंत 24 कॅरेट सोन्याचा दर प्रतितोळा 88 हजार 800 रुपये इतका नोंदविला गेला. सायंकाळी दरात तब्बल अकराशे रुपयांची घसरण होऊन 87 हजार 700 रुपयांवर स्थिरावला. दरम्यान, सोन्याच्या दरांंमधील वाढ बघता, सोने लवकरच लाखाचा टप्पा गाठेल, असा अंदाज जाणकारांकडून व्यक्त केला जात आहे.
मागील काही काळापासून सोन्याचे दर झपाट्याने वाढत असून, गतवर्षभरात सोने दरात तब्बल 23 हजारांची वाढ झाल्याने, चालू वर्षाच्या प्रारंभीच सोने दरांनी 86 हजारांचा टप्पा गाठला. तर गेल्या दहाच दिवसांत सोने दरात दोन हजारांची वाढ झाल्याने, दरांनी 88 हजारांचा आकडा पार केला. दरवाढीचा वेग 75 टक्क्यांच्या वर असून, हा वेग असाच कायम राहिल्यास अवघ्या सहाच महिन्यांत सोने दर लाखाचा टप्पा गाठण्याची शक्यता आहे. मौल्यवान धातूचे दर बऱ्यापैकी आंतरराष्ट्रीय घडामोडींवर अवलंबून असल्याने सद्यस्थिती पाहता दरवाढीचा वेग आणखी वाढेल, असेच काहीसे चित्र आहे. विशेषत: ट्रम्प सरकारच्या धोरणामुळे जगभरात घडामोडींना वेग आल्याने, त्याचा परिणाम सोने आणि चांदीच्या किमतींवर होत आहे.