

नाशिक : सतीश डोंगरे
मागील काही महिन्यांपासून सोन्याच्या दरात होत असलेली वाढ पाहता पुढील काही महिन्यांत सोने एक लाखाचा टप्पा गाठण्याची शक्यता आहे. २०२३ ते २०२५ या कालावधीतील सोने दरातील वार्षिक वाढ मोठी असून ती सरासरी ७५ टक्क्यांवर आली आहे. जानेवारी २०२४ मध्ये सोने दर ६३ हजारांवर होता. त्यात २३ हजारांची वाढ होऊन थेट ८६ हजारांवर तो गेला आहे. सोने खरेदी करणे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले असले, तरी गुंतवणूकदार याकडे मोठी संधी म्हणून बघत आहेत.
२०२० ते २०२३ पर्यंत सोने दरवाढीचा वार्षिक वेग ५ ते ६ हजार रुपयांपर्यंत होता. जानेवारी २०२० मध्ये २४ कॅरेट सोने प्रतितोळा ४१ हजार ९२० रुपयांवर होते. जानेवारी २०२३ मध्ये ते ५४ हजार ८६७ रुपयांवर पोहोचले. तीन वर्षांत दरात १५ हजार ३६८ रुपयांची वाढ झाली; तर जानेवारी २०२४ मध्ये सोने दर ६३ हजार २५० रुपये इतका होता. अवघ्या वर्षभरातच त्यात तब्बल २३ हजारांची वाढ होऊन जानेवारी २०२५ च्या प्रारंभी सोने ८६ हजारांवर पोहोचले आहे. सध्या सोन्याने सर्व जुने विक्रम मोडीत काढले.
• सोमवारी (दि. १० फेब्रुवारी) सोन्याच्या दरात २९०० रुपयांनी वाढ झाली आहे. हा दर सोमवारी ८६,००० रुपये प्रति १० ग्रॅम होता. तथापि, जागतिक पातळीवर १.१३ टक्क्यांच्या तेजीसह २९२१.९१ डॉलर प्रति औंस दर राहिला. ही वाढ अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टैरिफच्या धमक्यांमुळे झाल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
सोने दरवाढ झाली आहे; तर तीन वर्षांपासून सोने दरवाढीचा वेग ७५ टक्क्यांनी वाढला आहे. पाच वर्षांपूर्वी ज्या ग्राहकाने एक लाखाचे सोने घेतले होते, त्याला आजच्या भावाने ५४ रुपये ८० पैसे दराने दिवसाला परतावा मिळाला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील घडामोडी पाहता दर आणखी वाढण्याची शक्यता आहे. दिवाळीपर्यंत सोने लाखाच्या घरात असेल.
चेतन राजापूरकर, संचालक, इंडिया बुलियन व ज्वेलर्स असोसिएशन