

पणजी : क्रांतीराज सम्राट
राज्यात लोककलेचे अनेक पहलू पाहायला मिळतात. परंतु तीन वेगवेगळ्या पिढ्या एकत्र येऊन या वारशाची मशाल पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवत आहेत, ही अत्यंत अभिमानास्पद बाब आहे. वाळपई जवळील घोटেলি नं. १ येथील सुभद्रा अर्जुन गावस (आजी), जानकी रघू परब (मुलगई) आणि जान्हवी रघू परब (नात) या तीन महिलांनी लोककला संवर्धनाचे एक आदर्श उदाहरण समोर ठेवले आहे.
जानकी परब (पूर्वाश्रमीच्या संगीता अर्जुन परब) या आपल्या आई आणि मुलीसोबत मिळून गोव्याच्या समृद्ध लोककलेचा वारसा अविरतपणे पुढे चालवत आहेत. यात फुगडी, धालो, गोफ, लग्नगीते, दवली, कुणबी नृत्य, लोकसंगीत, लोकनृत्य यांसारख्या पारंपरिक कलांससोबत दशवतारी कलादेखील मोठ्या उत्साहाने सादर करतात. विशेष म्हणजे, घरच्यांसोबतच परिसरातील मुलंही या कलांचे धडे देत आहेत.
या तिघींच्या कलेची दखल केवळ गोव्यात नव्हे, तर राष्ट्रीय पातळीवर घेतली गेली आहे. जानकी परब यांना २०१८ मध्ये राज्य सरकारकडून 'युवा कला सुजन' तर पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, उदयपूरकडून 'नक्षत्र पुरस्काराने' गौरविण्यात आले आहे. आई सुभद्रा गावस यांना त्यांच्या बहुमूल्य योगदानाबद्दल राज्य सरकारने 'कला गौरव पुरस्कार'ने सन्मानित केले आहे.
जानकी यांची १२ वीमध्ये शिकणारी मुलगी जान्हवी हिने २०२५ मध्ये कॉलेजच्या माध्यमातून क्रीडा खात्याच्या संघातून दिल्लीत जाऊन आपल्या कलेचे जोरदार प्रदर्शन केले आहे. या तिघींनी दिल्ली, हैदराबाद आणि महाराष्ट्रातील विविध शहरांत आपल्या कलागुणांची जादू दाखवली आहे.
कलेचे जतन करताना कलाकारांना येणाऱ्या अडचणीवर भाष्य करताना जानकी परब म्हणतात की, लोककला टिकवायची असेल तर तिचे शिक्षण शालेय स्तरावर देणे आणि स्पर्धांचे आयोजन करणे अत्यंत गरजेचे आहे. तसेच, सरकारच्या मानधनाच्या निकषांमध्ये बदल करण्याची गरज असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले.
त्या म्हणतात, 'सरकारकडून पुरस्कार स्वरूपात मोठी रक्कम दिली जाते, पण ती वयाच्या ६० वर्षांनंतर मिळते. आजच्या धकाधकीच्या युगात किमान २५ वर्षे सततपणे सादरीकरण करणाऱ्या कलाकारांना वयाची अट न ठेवता मानधन दिले पाहिजे. कला जोपासण्यासाठी आर्थिक बळ मिळेल.'
शिक्षण आणि कलेचा सुवर्णसमन्वय:
वाळपई येथील हेडगेवार हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणून मुलांना शिक्षण देत असताना जानकी परब विद्यार्थ्यांमध्ये लोककलेची आवड निर्माण करत आहेत. 'नवीन शैक्षणिक धोरणात लोककलेचा सहज उपयोग होऊ शकतो,' असे सांगत त्या म्हणतात, 'फुगडी आणि धालोसारख्या लोककलांना वाद्यांची गरज नसते. परंतु काळाची गरज ओळखून त्यात वाद्या योग्य मेल घातल्यास त्या आणखी सुंदर होऊ शकतात.' ज्ञानज्योती महिला मंडळ, च्या माध्यमातून त्या इच्छुक महिलांना या कलांचे धडे देत आहेत.
'गोव्याच्या महिला लोकनृत्यात फारसे संगीत नसते, ही परंपरा आपल्याला पूर्वापार लाभली आहे आणि ती तशीच पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा आमचा अखंड प्रयत्न आहे.'
— जानकी रघू परब