

नाशिक : नववर्षाच्या स्वागतासाठी 31 डिसेंबरच्या रात्री आयोजित होणार्या स्नेहभोजन आणि पार्ट्यांमध्ये नागरिकांना स्वच्छ, निर्भेळ व सुरक्षित अन्न मिळावे, यासाठी राज्याच्या अन्न व औषध प्रशासन विभागाकडून (एफडीए) राज्यव्यापी मोहीम राबविली जाणार आहे. 'स्वागत नववर्षाच : संकल्प हॉटेल स्वच्छतेचा' असे या मोहिमेचे नाव असून, 15 नोव्हेंबर ते 31 डिसेंबर या कालावधीत हॉटेल्स, क्लब हाऊस, फार्म हाऊस आदी ठिकाणी कडक तपासण्या केल्या जाणार आहेत.
यासंदर्भात अन्न व औषध प्रशासन, विशेष सहाय्य मंत्री नरहरी झिरवाळ यांनी गुरुवारी (दि. 20) पत्रकार परिषदेत मोहिमेची माहिती दिली. मंत्री झिरवाळ म्हणाले की, नववर्षाच्या पार्ट्यांमध्ये मोठ्या प्रमाणात अन्नपदार्थांचा वापर होतो. हे अन्नपदार्थ पूर्णपणे स्वच्छ व सुरक्षित असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे या काळात हॉटेल्सची विशेष तपासणी करून नागरिकांचे आरोग्य सुरक्षित ठेवणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे.
मोहिमेचे प्रमुख वैशिष्टये अशी...
प्रत्येक अन्न सुरक्षा अधिकार्याला आपल्या कार्यक्षेत्रातील 20 मोठ्या हॉटेल्सची सखोल तपासणी करावी लागणार.
सहाय्यक आयुक्त (अन्न) 10, सहआयुक्त (अन्न) 10 तर स्वतः आयुक्त (एफडीए) राज्यातील 5 हॉटेल्सच्या तपासणीसाठी प्रत्यक्ष उपस्थित राहणार.
मुदतबाह्य कच्चा माल, पनीरऐवजी रपर श्रेर्सीश चीज, आईस्क्रीमऐवजी फ्रोझन डेझर्ट, अन्नपदार्थांत अखाद्य रंगांचा वापर, हॉटेल स्वच्छता आदी बाबींची काटेकोर तपासणी करतील. त्रुटी आढळल्यास तात्काळ सुधारणा नोटीस/कारणे दाखवा नोटीस. विनापरवाना हॉटेल्सवर थेट कारवाई
सुधारणा न करणार्या हॉटेल्सचा परवाना निलंबित किंवा रद्द करण्याची तरतूद.
उत्तम हॉटेल्सला होणार सन्मान
स्वच्छता व अन्न सुरक्षा मानके पूर्ण करणार्या हॉटेल्सना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य, विभाग, जिल्हा, तालुका व महानगरपालिका/नगरपालिका अशा विविध स्तरांवर समित्या स्थापन करण्यात येणार आहेत. या समित्या गुणानुक्रमे पहिल्या तीन उत्तम हॉटेल्सना 26 जानेवारी 2026 (प्रजासत्ताक दिन) रोजी प्रमाणपत्र देऊन सन्मानित करतील.
कारवाईचा अहवाल 1 जानेवारीपर्यंत
ज्या हॉटेल्सवर कारवाई होईल, त्याचा एकत्रित अहवाल आयुक्त (एफडीए) यांनी 1 जानेवारी 2026 रोजी सकाळी 11 वाजेपर्यंत मंत्री कार्यालयास सादर करावा, असेही निर्देश देण्यात आले आहेत असेही मंत्री झिरवाळ यांनी सांगितले.