

Additional buses will be launched at Srikshetra Trimbakeshwar on the occasion of the third Shrawan Monday
नाशिक : तिसऱ्या श्रावणी सोमवारनिमित्त श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे भाविकांच्या सोयीसाठी सिटीलिंकच्या वतीने दि. १० व ११ ऑगस्ट असे दोन दिवस जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. या दिवशी नियमित २८ तसेच जादा २० अशा एकूण ४८ बसेस त्र्यंबकेश्वरसाठी सोडण्यात येणार आहे. नाशिकरोड, निमाणी आणि सीबीएस येथून या बसेस सोडल्या जाणार आहेत.
बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर म्हणजे लाखो शिवभक्तांचे श्रद्धास्थान. अशातच श्रावण मासानिमित्त अनेक शिवभक्त त्र्यंबकराजाच्या चरणी नतमस्तक होतात. श्रावण महिन्यात येथील तिसऱ्या सोमवारला विशेष महत्त्व असते. तिस-या श्रावणी सोमवारी तर लाखो शिवभक्त त्र्यंबकेश्वरच्या दर्शनासाठी तसेच फेरीकरिता जात असतात. या भाविकांची कोणतीही गैरसोय होऊ नये याकरिता नाशिक महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड अर्थातच सिटीलिंकच्या वतीने जादा बसेसचे नियोजन करण्यात आले आहे.
रविवारी (दि. १०) व सोमवारी (दि. ११) असे सलग दोन दिवस या जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. सद्यस्थितीत नाशिकरोड ते त्र्यंबकेश्वर मार्गे निमाणी या मार्गावर एकूण २८ बसेस सोडण्यात येतात. त्यानुसार या २८ बसेसच्या माध्यमातून नाशिकरोड ते त्र्यंबकेश्वर ११२ फेऱ्या, तर त्र्यंबकेश्वर ते नाशिकरोड ११२ फेऱ्या अशा एकूण २२४ फेऱ्या नियमित चालविण्यात येतात. रविवारी व सोमवारी प्रत्येक दिवशी नियमित २८ तसेच जादा २० अशा एकूण ४८ बसेस त्र्यंबकेश्वरकरिता मार्गस्थ करण्यात येतील. या ४८ बसेसच्या माध्यमातून सुमारे ३८४ फेऱ्या भाविकांच्या सेवेकरिता करण्यात येतील, असे सिटीलिंक प्रशासनाच्या वतीने कळविण्यात आले आहे.