

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
शिंगाडा तलाव परिसरातील एम.एस.आर.टी.सी. वर्कशॉपमध्ये चोरीच्या उद्देशाने घुसलेल्या चौघांनी डेपोतील कर्मचाऱ्यांना कोयता व रॉडचा धाक दाखवत शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली. संशयितांनी कर्मचाऱ्यांवर हल्ला करण्याचाही प्रयत्न केला. मात्र, संबंधित कर्मचाऱ्याने वार चुकविल्यामुळे अनर्थ टळला. याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी (दि. १) रात्री ९.३५ च्या सुमारास एन. डी. पटेल रोडवरील शिंगाडा तलाव परिसरातील एम.एस.आर.टी.सी. वर्कशॉपमधील ट्रान्सफॉर्मर रूमजवळ हा प्रकार घडला. फिर्यादी अमेय प्रदीप श्रावगे (३५) यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
भूषण व राहील अशी नावे असलेले दोन संशयित तसेच त्यांच्यासोबत आणखी दोन अनोळखी तरुण डेपोच्या भिंतीवरून उडी मारून ट्रान्सफॉर्मर रूम परिसरात आले. ते डेपोतील साहित्य चोरीच्या उद्देशाने आत शिरल्याचा संशय आहे.
फिर्यादीने त्यांना हटकले असता, संशयित संतापले. त्यांनी धारदार कोयता व लोखंडी रॉड घेऊन कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केली. लोखंडी कोयताधारी संशयिताने फिर्यादीचे सुपरवायझर अंकुश चिखले यांच्यावर वार केला. मात्र, चिखले यांनी प्रसंगावधान राखत वार चुकविल्यामुळे ते बचावले.
याच वेळी संशयितांनी कर्मचाऱ्यांना धमकावत पोलिसांना कळविल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे. संशयितांच्या हालचालीमुळे डेपो परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर मागे थांबलेल्या अन्य तरुणांनी कर्मचाऱ्यांच्या दिशेने दगडफेक केली.
या दगडफेकीमुळे कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. संशयितांनी पुन्हा शिवीगाळ करीत कर्मचाऱ्यांना मागे हटण्यास सांगितले. तसेच भूषण व राहील यांना पोलिसांच्या ताब्यात देऊ नका, अन्यथा परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी दिल्याची तक्रारीत नमूद आहे. पोलिसांची चाहूल लागताच चौघांनी डेपोमागील बाजूला धाव घेत येथील लेबर कोर्ट भिंतीवरून उड्या मारून पलायन केले. घटनेनंतर भद्रकाली पोलिसांनी प्रकरणाची नोंद घेत संशयितांचा शोध सुरू केला आहे.