

पुढारी ऑनलाइन डेस्क | गेल्या अनेक दिवसांपासून नाशिक व रायगड जिल्ह्यातील पालकमंत्रीपदावरुन महायुतीत वाद सुरु आहे. नाशिकमध्ये भाजपचे गिरीश महाजन व रायगड मध्ये राष्ट्रवादीच्या आदिती तटकरे यांच्या नावाची घोषणा केल्यानंतर महायुतीत हा वाद उफाळून आला होता. त्यानंतर चोवीस तासांच्या आत या दोनही जिल्ह्यातील पालकमंत्री पदाला स्थगिती देण्यात आली होती.
मात्र आता नाशिक जिल्ह्यातील पालकमंत्री पदाचा तिढा सुटल्याची माहिती आहे. नाशिकचे पालकमंत्री पद भाजपकडेच राहणार असल्याचे स्पष्ट झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकचे पालकमंत्रीपद भाजपकडेच राहणार असून ते अन्य कोणाला दिले जाणार नाही असा स्पष्ट संदेश भाजपच्या दिल्लीतील नेतृत्वाने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना दिला आहे. गिरीश महाजन हेच नाशिकचे पालकमंत्री असणार आहेत.
दरम्यान, रायगड जिल्ह्यातील पालकमंत्रीपदाचा तिढा मात्र कायम आहे. रायगड मध्ये राष्ट्रवादीच्या आदिती तटकरे व शिवसेनेचे भरत गोगावले पालकमंत्रीपदासाठी इच्छुक आहेत. पालकमंत्रीपदावरुन रायगडमध्ये शिंदे व अजित पवार यांच्या गटात मोठा वाद सुरु असून हा तिढा आता शिंदे व अजित दादा या दोघांनाच सोडवावा लागणार आहे. दोघांनी एकत्र बसून हा तिढा सोडवावा असे भाजप नेतृत्वाचे आदेश असल्याची माहिती आहे.
नाशिकमध्ये पालकमंत्री पदाच्या शर्यतीत अजित पवार गटाचे माणिकराव कोकाटे व शिंदे गटाचे दादा भुसे हेही होते. त्यात माणिकरावांना शिक्षा झाल्याने ते या शर्यतीतून बाद झाले. त्यामुळे महाजन व भुसे असे दोघेच या शर्यतीत उरले होते. त्यामुळे दादा भुसे आता काय भूमिका घेतात ते पाहावे लागणार आहे.