

पुढारी ऑनलाइन डेस्क | आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून महाराष्ट्रात सेंट्रल किचनचा उपक्रम राबवला जातो. मात्र, याच सेंट्रल किचनच्या माध्यमातून आदिवासी विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ सुरु असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नाशिक जिल्ह्यातील ४४ आश्रमशाळांतील १८ हजार विद्यार्थ्यांना सेंट्रल किचनच्या माध्यमातून चक्क सडलेला भाजीपाला, किड लागलेले कडधान्य खाण्यास दिले जात आहे. इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर यांनी नाशिकच्या सेंट्रल किचनवर अचानक टाकलेल्या छाप्यात हा प्रकार समोर आला आहे.
तालुक्यातील मुंडेगाव येथील सेंट्रल किचनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पोषण आहाराच्या नावाखाली निकृष्ट दर्जाचे अन्न खाण्यास दिले जात आहे. जनावरेही खाणार नाहीत असा आहार या आदिवासी विद्यार्थ्यांना दिला जातो. इगतपुरी मतदारसंघाचे आमदार हिरामण खोसकर यांनी या ठिकाणी अचानक भेट दिल्यानंतर ही बाब उघड झाली. खोसकर यांनी गुरुवारी (दि. ९) सकाळी अचानक छापा टाकत हा प्रकार उघडकीस आणला. यावेळी संबधित अधिकाऱ्यांना खोसकरांनी चांगलेच खडसावले. तुमची पोरं असे अन्न खातील का? आदिवासी पोरांचा तळतळाट घेताना लाज कशी वाटत नाही या शब्दात खोसकरांनी अधिकाऱ्यांचा समाचार घेतला.
आमदार खोसकर यांनी सेंट्रल किचनमध्ये प्रवेश केल्यानंतर अतिशय अस्वच्छ जागेवर अन्नपदार्थ तयार केले जात असल्याचे दिसून आले. धान्य आणि भाजीपाल्यावर उंदरांचा वावर दिसला. टाकीतील हरभरा, वाटाणा व चवळी ही कडधान्ये किडलेली, बुरशीयुक्त असल्याचे समोर आले आहे. या कडधान्यांमध्ये मोठ्या प्रमाणात किडे आढळून आले. किड्यांनी पोखरलेली ही कडधान्ये विद्यार्थ्यांना खायला दिली जात आहेत. तांदळाचा दर्जादेखील चांगला नाही. इतकेच नव्हे तर विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या चपात्याही एका बाजूने कच्च्याच होत्या. हे सगळं पाहून आमदार खोसकर आक्रमक झाले. जोपर्यंत संबधितांवर कारवाई होत नाही तोपर्यंत आमरण उपोषणाचा इशारा त्यांनी दिला आहे. मंत्रालयात बैठक घेऊन दोषींवर निलंबनाची कारवाई करावी असा प्रस्ताव ठेवणार असल्याचे खोसकरांनी सांगितले.