

सटाणा (नाशिक ): उत्तर महाराष्ट्रातील आकर्षणाचे केंद्रबिंदू असलेल्या येथील संत शिरोमणी देवमामलेदार यशवंतराव महाराजांच्या यात्रोत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे. सोमवारी (दि. 15) पहाटेपासून होणार्या महापूजेने प्रत्यक्ष यात्रेला प्रारंभ होणार असून, दुपारी पारंपरिक रथयात्रा निघणार आहे.
यासाठी संपूर्ण यशवंतनगरी भक्तिमय आणि उत्सवी वातावरणाने नटली आहे. देवस्थान परिसरातील मंडप, प्रकाशयोजना, फुलांची सजावट तसेच विविध व्यवस्थांची कामे वेळेआधी करण्यात आली आहेत. यशवंत लीलामृत पारायण चार दिवसांपासून सुरू असून, त्यात भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत, अशी माहिती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष भालचंद्र बागड यांनी दिली.
सफला एकादशीनिमित्त पहाटे 4 ला महाराजांची महापूजा केली जाईल. तहसीलदार कैलास चावडे, प्रतिभा चावडे, देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष भालचंद्र आप्पा बागड, अरुणा बागड, नगर परिषदेच्या मुख्याधिकारी ज्योती भगत-पाटील व स्वप्निल पाटील तसेच देवस्थानच्या अन्य ट्रस्टींपैकी सदस्य आणि त्यांच्या सहचारिणी यांच्या हस्ते विधिवत महापूजा व महाआरती होईल. सकाळपासूनच मंदिर परिसरात मंत्रोच्चार, भजन-कीर्तनाचा गजर सुरू होईल. दुपारी 4 ला मंदिरापासून निघणारी भव्य रथ हे मिरवणूक यात्रोत्सवाचे मुख्य आकर्षण असेल. पारंपरिक वाद्य आणि जयघोषांत सजविलेल्या रथातून यशवंतराव महाराजांची मूर्ती नगरपरिक्रमा करणार आहे. सालाबादाप्रमाणे रथपूजनाचा मान यंदाही पोलिस प्रशासनाकडेच आहे. प्रमुख मार्गांवर मिरवणूक स्वागतासाठी विविध मंडळांकडून कमानी उभारल्या आहेत.
यात्रोत्सवाच्या पोर्शभूमीवर महाप्रसाद, हरिकीर्तन, भजनसंध्या, कुस्ती स्पर्धा, धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम होतील. शहरासह तालुका व जिल्ह्यातील सर्व भाविक, भक्तांनी यात्रोत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन देव मामलेदार यशवंतराव महाराज देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष बागड यांनी केले आहे. यात्रोत्सव भक्तांना आध्यात्मिक समाधान देणार असून, शहरात उत्साह, भक्ती आणि समृद्धीचे वातावरण निर्माण झाले आहे.