

माऊली जन्मास 750 वर्षे पूर्ण झाली. त्यांचा जन्मोत्सव मोठ्या आनंदाने महाराष्ट्रातील गावागावातून श्री ‘ज्ञानेश्वरी’च्या विचारधन उत्सवातून साजरा करण्यात आला. गेल्या आठवड्यात आळंदीत पार पडलेला उत्सव तर ऐतिहासिक स्वरूपाचा. माऊली मंदिरावर 22 किलोचा सुवर्णकलश मंदिर समितीच्या पुढाकाराने व मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्या करकमलाने प्रतिष्ठापीत केला. हा सर्व महाराष्ट्रीयांसाठी अभिमानाचा, गर्वाचा क्षण होता. आपण आता आपल्या लेखमालेकडे येऊ यात, गतलेखातून आपण संसार वृक्षाच्या राजस - तामस - सात्विक अहंकाराची माहिती घेतली. त्यांचे ‘पंचीकरण’ होऊन रस-रूप-गंध-स्पर्श-शब्द या ‘पाच तन्मात्रांची निर्मिती होते, यांनाच ‘पंचतन्मात्रा’ असे संबोधतात त्यापुढील भाग आजच्या लेखात -
॥ श्री ॥
पंचतन्मात्रांना पंचमहाभूताचे सुक्ष्म रूप मानले जाते. त्यांची अनुभूती जीवाला कान, नाक, त्वचा, जीभ आणि डोळे या पांच इद्रियांद्वारे घेता येते. पंचतन्मांचे विषय अनेक आहेत. शब्द-स्पर्श-रस-रूप-गंध यांच्या विषयांना पारावार नाही. मानवी जीवन याच संबंधाने अक्षरशः ओतप्रोत भरलेले आहे; व्यापलेले आहे.
संसारवृक्ष मानवासह देव-मानव आणि तीर्यक योनींनी बहरलेला आहे.
1. देवयोनी - ही सात्विक कर्म व पुण्यामुळे मिळते. देव म्हणजे स्वर्गिय शक्ती, ज्यांचे आयुष्य भोगप्रधान असते. देवयोनीत जन्मलेल्या जीवांना भोग (सुखाचा) मिळतो, पण तिथे मोक्ष नाही. मानवी जीवनात शांती, करुणा, दान, सदाचार, सत्यपालन यांच्या माध्यमातून किंवा यांच्या पालन पोषणाने मानवास देवयोनी प्राप्त होते.
2. मनुष्य योनी :-84 लाख योन्यापैकी सर्वात श्रेष्ठ योनी, मानव योनीत विवेक, विचारशक्ती व कर्मयोग आहे. मानवाला पुण्य व पाप दोन्ही करण्याची क्षमता असते. विवेकानुसार धर्म आचरण किंवा अधर्म आचरण याच माध्यमातून कर्म करता येते. ज्ञानयोगाला गवसणी घालत मोक्ष प्राप्त करता येऊ शकतो. मोक्षाला जाण्याच सामर्थ्य केवळ मानव योनीतच जन्म घेतल्याने प्राप्त होतं.
3. तीर्यक योनी -पशु-पक्षी- किटक, प्राणी, जलचर 3. योन्या तिर्यक मध्ये येतात. या योनीत जीव केवळ भोग व आसक्ती यात गुरफटलेला असतो. त्यांच्या जीवनाचे अन्न, निद्रा, भय व मैथुन हे केवळ चारच आधार असतात. विवेक आणि विचारधर्म पालन करण्याची क्षमता या योनीत नसते.
थोडक्यात - पुण्यामुळे देवयोनी मिळते पण सुख-प्रधान असूनही तिथे मोक्षप्राप्तीची संधी नाही. मनुष्य योनीत पुण्य-पाप मिश्र, विवेकाने मोक्षप्राप्तीची खरी संधी. तीर्यक योनीत अज्ञान, आसक्ती असते पाप आचरनामुळेच प्राण्यात जन्म, भोगप्रधान, विवेकशून्यता. ही लक्षणे या वर्गात असतात.
अश्वत्य वृक्षाला वरील तीन योनींसह 84 लक्ष योनीचे अंकुर फुटलेले असतात. हा विश्वव्यापक संसारवृक्ष म्हणता येईल. अश्वत्थ वृक्षाने धारण केलेल्या रज-तम-सत्व फांद्यातून रस-रूप - स्पर्श-गंध-शब्द यांची रसद अनेक विषयांना पुरवीली जाते. ती घेऊ न 84 लक्ष योनीत जन्माला आलेल्या जीवांच्या अंगोपांगातून सतत पुरवली जाते. 84 लक्ष योनींची थोडक्यात माहिती तुम्हाला गरुड पुराण, पद्म पुराण व लिंग पुराणामधून जी आपल्या ऋषीमुनींनी दिलेली आहे ती येणेप्रमाणे.
1. जलचर - 9 लक्ष योनी (मासे, मगर, कालव, झिंगे इ. )
2. स्थावर - 20 लक्ष योनी (वृक्ष, वेली, गवत, फळझाडे, स्थावर 20 लक्ष योनी फुलझाडे इ.)
3. कीटक - 11 लक्ष योनी (मुंग्या, माशा, डास, मधमाशा इ.)
4. पक्षी - 10 लक्ष योनी (गरुड, कावळा, चिमणी इ.)
5. पशू - 30 लक्ष योनी (गाई, बैल, घोडा, सिंह इ.)
6. मनुष्य - 04 लक्ष योनी (विविध- प्रदेश, प्रोत, जग इ. मनुष्य)
वरील प्रमाणे 84 लक्ष योनीत सर्वश्रेष्ठ योनी मनुष्य योनीच आहे; हे उपरोल्लेखीत पुराणात नमूद करण्यात आले आहे. विवेकाने मानवी जीवनाला मोक्ष प्राप्त होऊ शकतो, हाच इतर योनी आणि मानवी योनीतील फरक आहे.
ऋग्वेद, यजुर्वेद आणि सामवेद यांची पाने संसारूपी वृक्षास (अश्वत्थ) लगडलेली आहे; यांचा अत्यंत जवळचा संबंध हा मानवी जीवनाशीच येतो. वेदांचे किंवा त्यातील ज्ञानाचे रसग्रहण करण्याची क्षमता फक्त मानवी योनीत आहे. त्यामुळे प्राप्त नरदेह हा दुर्लभ. त्याला सुलभ करत मोक्ष मार्गस्थ होण्याच्या दिशेने टाकलेले पहिलं पाऊल म्हणजे विवेकाची कास धरून नीती-धर्म मार्गाचरण करणे, हेच आहे. वेदाध्ययनाची क्षमता मानवी देहात आहे म्हणूनच माऊ ली म्हणतात.
आणि वेदत्रयाचिया पाना । नये अन्यय लागों अर्जुना ।
जे मनुष्यावांचूनि विधाना । विषय नाही ॥
वेदांताचा परिपाक गीतेमध्ये आलेला आहे. गीतेेचं तत्वज्ञान माउलींनी तुम्हा-आम्हासाठी श्री ज्ञानेश्वरीमधून सांगितलेलं आहे.
श्री ज्ञानेश्वरीमधून आणलेली विचारगंगा आपण शिरोधार्य धरावी म्हणून अनेक संत-महंत, वारकरी सांप्रदायासाठी आयुष्य झिजवीलेले प्रज्ञावंतांनी सर्वसामान्य माणसांचे प्रबोधन-उद्बोधन
केलं आहे.
येथे पाहिजे जातीचे। येरागबाळ्याचे काम नोहे॥
या न्यायाने सन्मार्गाला, संतसंगतीला, सत्संगाला लागण्यासाठी अनेक वर्षाचं, जन्माचं सुकृत कामाला येते. उगाच कोणीही उठून सदाचार आणि सद्विचार धारण करूच शकत नाही !!!!! यावर माझा माऊली कृपेणं ठाम विश्वास आहे. कोणाच्याही पोटी जन्माला आल्याने पुण्याना आणि पापानं ओंजळ भरतच नाही. केवळ व फक्त स्वत:च्या कर्मातूनच आपआपल्याला आपले संचित जमा करता येते. जेवढे चांगले वागाल, कर्म कराल (कायिक, वाचीक, मानसिक) तेवढाच पाप-पुण्याचा साठा कमी-जास्त होणार हे त्रिवार सत्य !!! गेल्या हजारो वर्षापासून हेच तत्वज्ञान गीता-ज्ञानेश्वरीसह भरतखंडात लाखो संत, महंत, तत्वज्ञानी सांगत आले. पण, त्यांचं ऐकलं कित्येकांनी? अंगीकारणारे किती? त्यांच्या प्रती श्रद्धा ठेवणारे किती? आणि त्यांच्या ज्ञानाविषयी शंका घेणारे किती? याचा विचार न केलेला बरा !!! असंच शेवटी म्हणावे लागेल. असो
मानवी जीवन खरोखरीच दुर्लभ आहे. या जीवनात, ‘आपली आपण करा सोडवण’ असे जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकोबाराय यांनी सांगितलेलं आहे. जीवनात अनेक विचारधारा, विचारप्रवाह, मत-मतांतरे भेटतील त्यातील चांगले-वाईट ओळखण्याचं सामर्थ्य माझ्या वाचकांना मिळू देत. त्यांचा सत्संगाचा विचारप्रवाह गंगेच्या पाण्याच्या पावित्र्यासारखा विशुद्धपणे जनमनात प्रवाहीत राहू देत. भेदाभेदांनी ग्रासलेल्या विचाराचा थोडाही वारा माझ्या भाविक भक्तांना लागू नये हेच माऊलींना मागणे! या सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती निमित्ताने माऊलींचा कृपाशीर्वाद सतत माझ्या भाविक भक्तांना मिळत राहो, हीच शुभकामना. रामकृष्णहरी