

नाशिक : तपोवनातील वृक्षतोडीस विरोध करणाऱ्यांपैकी रोहन देशपांडे यांच्यासह काही हिंदुत्ववाद्यांनी महारूद्र व महामृत्यूंजय जपयागाचे आयोजन केल्याने पर्यावरणप्रेमींमध्ये फूट पडली आहे. एका गटाने या यज्ञास विरोध दर्शवित पर्यावरण संवर्धनाशी यज्ञकार्याचा काहीही संबंध नसल्याची भूमिका स्पष्ट केली आहे. दरम्यान, महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने यज्ञ मंडप हटविल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता.
नाशिकचा हरितकुंभ निर्विघ्न पार पडावा, या हेतूने तपोवन येथे महारुद्र व महामृत्युंजय जपयागाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती देशपांडे यांनी दिली. सदर यज्ञ सोहळा प्रभू श्रीराम, सीता माता व लक्ष्मण भगवान यांच्या सान्निध्यात संपन्न होत असून प्रती यजमान म्हणून देशपांडे व खानापुरे परिवार तर संयोजन नाशिककरांच्या वतीने करण्यात आले आहे. यज्ञाच्या पुढील टप्प्यात रविवारी रुद्रापूजन होणार असून भाविकांनी प्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
दरम्यान, यज्ञस्थळी महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने यज्ञ मंडप हटविल्याने काही काळ तणाव निर्माण झाला. यज्ञ आयोजनाबाबत महापालिकेस लेखी स्वरूपात पूर्वसूचना देण्यात आली असतानाही कोणतीही लेखी नोटीस न देता धार्मिक कार्यात हस्तक्षेप करण्यात आल्याचा आरोप यज्ञ समितीने केला आहे. या कारवाईमुळे यज्ञ कार्यात काही काळ अडथळा निर्माण झाला.
प्रभू श्रीरामांच्या पवित्र तपोवनात त्यांचीच परवानगी मागण्याची आवश्यकता काय? असा सवाल उपस्थित करत यज्ञ समितीने नाराजी व्यक्त केली. यावेळी घटनास्थळी हिंदुत्ववादी कार्यकर्ते गजू घोडके, कातकडे व रघु चौधरी यांनी उपस्थित राहून प्रशासनाच्या भूमिकेवर खेद व्यक्त केला. काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाल्यानंतर पहिल्या दिवसाची पूजा विधिवतरीत्या संपन्न झाली. एकीकडे बेकायदेशीर वृक्षतोड व कपिला नदीतील अतिक्रमणांकडे दुर्लक्ष करणारी महापालिका, तर दुसरीकडे तात्पुरत्या धार्मिक यज्ञाला विरोध करत असल्याचा आरोप होत आहे.