

नाशिक : कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय एकही झाड न तोडण्याचे आदेश हरित लवादाचे असताना त्या आदेशाला नाशिक महापालिकेने केराची टोपली दाखविल्याचे समोर आले आहे. आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील तिडके कॉलनी परिसरात रस्ता व पूल बांधण्यासाठी तब्बल 30 ते 40 झाडे तोडण्यात आली आहेत. महापालिकेच्या या कृतीविरोधात पर्यावरणप्रेमींनी तीव्र संताप व्यक्त करीत न्यायालयात दाद मागण्याचा पवित्रा घेतला आहे.
येथे 2027 मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी तपोवन परिसरात साधू-महंतांच्या राहण्याची सोय करण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात साधुग्राम उभारण्यात येणार आहे. त्यासाठी तपोवन भागातील तब्बल 1,800 वृक्ष तोडण्याचा प्रश्न न्यायालयात आहे. दुसरीकडे कुंभमेळ्यासाठी शहरातील तिडके कॉलनी परिसरात रस्ता आणि पूल बांधण्यासाठी तब्बल 30 ते 40 झाडे तोडण्यात आली आहेत.
काही दिवसांपूर्वीच नाशिक जिल्ह्यातील झाडे तोडण्याबाबत हरित लवादाने कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय एकही झाड तोडू नये असा निर्णय दिला होता. मात्र, त्याला नाशिक महानगरपालिकेने केराची टोपली दाखविली असून, मोठ्या प्रमाणात वृक्षतोड सुरू असल्याचे पर्यावरणप्रेमींनी म्हटले आहे. याबाबत न्यायालयात दाद मागण्याची भूमिका त्यांनी घेतली आहे.
तिडके कॉलनीतील पुलासाठी महानगरपालिकेने 40 झाडे तोडली आहेत. पाच दिवसांपूर्वीच हरित लवादाने निकाल दिला होता की, नाशिक जिल्ह्यातील एकही झाड तोडू नका. पण नाशिक महानगरपालिकेने हरित लवादाच्या आदेशाला केराची टोपली दाखवित झाडे तोडली. हा हरित लवादाच्या निकालाचा अवमान आहे. याबाबत आम्ही याचिकाकर्ते यांचे वकील श्रीराम पिंगळे यांच्या निदर्शनास ही गोष्ट आणून दिली असून, त्यांना येथील व्हिडिओ, फोटो पाठविले आहेत.
याबाबत आम्ही नाशिक महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना विचारणा केली आहे की, ही झाडे तोडली त्या बदल्यात कुठे झाडे लावणार आहेत. मात्र त्यांनी यावर कुठलेही उत्तर दिले नाही. त्यामुळे कुठलीही प्रक्रिया न करता ही वृक्षतोड का केली? असा आमचा प्रश्न आहे, असे पर्यावरणप्रेमी अमित कुलकर्णी यांनी म्हटले आहे.
आगामी कुंभमेळ्यासाठी तिडके कॉलनी परिसरात रस्ता आणि पूल बांधण्यात येणार आहे, यासाठी बांधकाम विभागाने आमच्याकडे परवानगी मागितली होती. वृक्ष प्राधिकरण समितीने महाराष्ट्र जतन अधिनियम कायदा 1975 च्या कायद्याने सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्यांना परवानगी दिली आहे. या कामासाठी त्यांनी 229 झाडे तोडण्याची परवानगी मागितली होती. त्यापैकी आम्ही 114 झाडे तोडण्याची परवानगी दिली आहे. त्यात 112 झाडे वाचवण्यात महानगरपालिकेला यश आले असून, 2 झाडांचे पुनर्रोपण करण्यात येणार आहे.
विवेक भदाणे, उद्यान अधीक्षक, महापालिका.