

नाशिक : एचटीटी आणि तेजस विमानाच्या बांधणीचा मोठा प्रकल्प नाशिक एचएएलमध्ये साकारला जात असून, त्यासाठी तिसरी प्रॉडक्शन लाइन टाकण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. पुढील तीन वर्षांत नाशिकच्या आकाशातही विमानेझेप घेताना दिसतील, असे प्रतिपादन हिंदुस्तान एरोनॉटिक्स लि.चे (एचएएल) मुख्य कार्यकारी अधिकारी साकेत चतुर्वेदी यांनी केले.
निमा इंडेक्स प्रदर्शनाच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. चतुर्वेदी म्हणाले, स्वदेशी बनावटीचे असलेले एचटीटी आणि तेजस या विमानाची बांधणी करण्यासाठी भरपूर सुटे भाग लागणार आहेत. यासाठी व्हेंडरशिपची मोठी गरज असून, नाशिकमधून हे गुड पार्टनर एचएएलला जोडले जावेत, अशी अपेक्षा आहे. कारण बेंगळुरूनंतर नाशिक झपाट्याने विकसित होत असून, पुढील दहा वर्षांत नाशिक हे देशातील दुसरे बेंगळुरू असेल, असेही ते म्हणाले. याशिवाय एचएएलने एअरबससोबत करार केला असून, जगभरातील फ्लाइट मेंटेनन्स आणि ओव्हर आॅइलिंगसाठी नाशिकमध्ये येणार आहेत. यावर एचएएल आणि हॅलकॉन यांचे काम सुरू आहे. कार्गो शिपमेंटमध्येही एचएएलने मोठी झेप घेतली आहे. गेल्या वर्षभरात ५० कार्गो शिपमेंटने विविध देशांमध्ये भरारी घेतली असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
स्वदेशी बनावटीचे हलके 'तेजस एमके -१ ए' या लढाऊ विमानाच्या उत्पादनाला गती देण्यासाठी एचएएलच्या नाशिक प्रकल्पात नवी उत्पादन साखळी कार्यान्वित करण्यात आली आहे. या आधीच्या दोन उत्पादन साखळ्या बंगळुरू येथे आहेत. नाशिकच्या तिसऱ्या साखळीमुळे एचएएलची उत्पादन क्षमता वर्षाकाठी १६ ते २४ विमानांनी विस्तारणार आहे. या निमित्ताने सुखोईनंतर नाशिक प्रकल्पात बऱ्याच वर्षांनी लढाऊ विमानाची बांधणी होणार आहे.
नाशिक, ओझर विमानतळावरून इंडिगो कंपनीच्या माध्यमातून देशातील सात प्रमुख शहरांना जोडणारी सेवा दिली जात आहे. आगामी काळात आणखी दोन ते तीन शहरे जोडली जावीत, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. उड्डाण सेवेत खंड पडू नये, यासाठी एचएएल विमानतळाला समांतर धावपट्टी तयार करणार असल्याचेही चतुर्वेदी यांनी स्पष्ट केले.