

नाशिक : महिलांचे लैंगिक शोषण, धर्मांतरण प्रकरणी दाखल गुन्ह्यात पोलिसांना सातत्याने गुंगारा देत असलेली संशयित निदा खान पोलिसांना शरण जाण्याची शक्यता असल्याचा दावा तिच्या निकटवर्तीयांनी केला आहे. प्रकृती अस्वस्थतेमुळे ती स्वतःचा बचाव करीत आहे. त्यासाठी तिने नाशिकरोड न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्जही सादर केला आहे. या जामीन अर्जावर सोमवारी (दि.२०) सुनावणी होणार आहे. जर तिचा अर्ज फेटाळला गेला तर ती पोलिसांना शरण जाईल, असा दावाही तिच्या निकटवर्तीयांनी केला आहे.
लैंगिक शोषण अन् धर्मांतरण प्रकरणात मुख्य संशयित आरोपी असलेल्या निदा खानचा पोलिसांना ताबा हवा आहे. तिच्या शोधासाठी पोलिसांची तीन पथकेदेखील रवाना करण्यात आली आहेत. मात्र, तिचा शोध घेण्यास पोलिसांना अजूनही यश आलेले नाही. दरम्यान, निदा खानने वकिलाच्या माध्यमातून न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज सादर केल्याने, पोलिसांसह संपूर्ण राज्याचे लक्ष सोमवारच्या सुनावणीकडे लागले आहे. त्यातच निदा खानच्या एका निकटवर्तीयाने, ती निर्दोष असल्याचे सांगताना तिला या प्रकरणात गोवले जात असल्याचे म्हटले आहे. निदा खान अन् तिचे कुटुंबीय सर्वसामान्य आहे. तिच्या वडिलांचा लाकडाचा व्यवसाय असून, ते रोजंदारीवर काम करतात. दीड-दोन वर्षांपूर्वीच तिचे लग्न झाले असून, सहा-सात महिन्यांपूर्वी तिने नाशिक येथे टीसीएस कंपनीत बदली करून घेतली होती.
याठिकाणी ती एचआर नसून, १२ हजार रुपये पगारावर काम करणारी सामान्य कर्मचारी असल्याचा दावाही या निकटवर्तीयाने केला आहे. तसेच प्रकृतीच्या समस्यांमुळे ती अद्याप पोलिसांसमोर हजर झालेली नाही. जर तिचा न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला, तर ती पोलिसांना शरण जाऊ शकते, असेही या निकटवर्तीयाने म्हटले आहे.
त्या दोघांना आज हजर करणार
पीडितेशी शारीरिक जवळीक साधल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात संशयित शफी शेख आणि रझा मेनन यांच्या कोठडीत २० एप्रिलपर्यंत वाढ करण्यात आली होती. या दोघांचेही टेरर कनेक्शन तपासण्यासाठी एटीएसमार्फत चौकशी करण्यात आली आहे. संशयितांचे भ्रमणध्वनी जप्त करण्यात आले असून, तांत्रिक विश्लेषणाद्वारे तपास केला जात आहे. दरम्यान, या दोघांची पोलिस कोठडी सोमवारी (दि.२०) संपणार असल्याने, त्यांना न्यायालयात हजर केले जाणार आहे.
ती महिला कोण ?
पोलिसांनी निदा खानच्या पतीला ताब्यात घेऊन जेव्हा त्याची चौकशी केली, तेव्हा ती गेल्या १४ एप्रिल रोजी मुंब्रा येथून गायब असल्याचे पोलिसांना सांगितले आहे. निदाला घेण्यासाठी एक महिला आली होती. त्या महिलेसोबत निदा गेली असून, तेव्हापासून मी देखील तिच्या संपर्कात नसल्याचा दावा तिच्या पतीने केला आहे. दरम्यान, निदाला घेऊन जाणारी ती महिला कोण? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.