

लासलगाव : लैंगिक शोषणप्रकरणी लासलगाव पोलिसांच्या कोठडीत असलेल्या भोंदूद्वाबाच्या नातेवाइकांकडून अंधश्रद्धा निर्मूलन समिती (अंनिस) चे राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे यांना लाच देण्याचा प्रयत्न झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी चांदगुडे यांनी नाशिकमध्ये इंदिरानगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
अंनिसच्या पुढाकाराने निफाड तालुक्यातील धारणगाव खडक येथील भोंदू महेशगिरी काकडे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. या कारवाईनंतर त्याचा तथाकथित दरबार बंद पडल्याने त्याचे नातेवाईक संतप्त झाले आहेत.
दरम्यान, बाबाच्या साथीदाराने चांदगुडे यांचा मोबाइल क्रमांक मिळवला आणि एका राजकीय कार्यकर्त्याच्या माध्यमातून संपर्क साधला. शुक्रवारी (दि. २४) सायंकाळी ६:५६ वाजता फोन करून संबंधित व्यक्तीने भेटण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र, चांदगुडे यांनी भेटण्यास नकार देत फोनवरच बोलण्यास सांगितले.
यावेळी संबंधिताने प्रकरण मिटवून घेण्यासाठी पैशांचे आमिष दाखवत लाचेचा प्रस्ताव मांडला. यावर चांदगुडे यांनी तीव्र शब्दांत नकार देत संबंधिताला सुनावले. त्यानंतर त्यांनी हा प्रकार अंनिस कार्यकर्ते तसेच इंदिरानगर पोलिस ठाण्याचे प्रभारी पोलिस निरीक्षक मनोहर कारंडे यांच्या निदर्शनास आणून दिला. चांदगुडे यांनी या संदर्भात लेखी तक्रार दाखल करत संबंधितांविरोधात कारवाईची मागणी केली आहे.
पोलिसांनीही प्रकरणाची दखल घेत आवश्यक ती कायदेशीर कारवाई केली जाईल, असे स्पष्ट केले आहे. दरम्यान, लासलगाव पोलिसांनी कोठडीत असलेल्या भोंदूद्वह्वाबाकडून काही महत्त्वाची माहिती मिळविल्याचे समजते.