

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
बहुराष्ट्रीय आयटी कंपनीतील महिला कर्मचारी लैंगिक शोषण प्रकरणातील संशयित आरोपी अश्विनी चैनानी हिला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. दोन दिवसांच्या पोलिस कोठडीनंतर १५ एप्रिलला न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायाधीशांनी काही मिनिटांतच तिची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्याचा आदेश दिला. यापूर्वी १२ एप्रिलला पुण्यातून तिला अटक करण्यात आली होती.
पीडित टीसीएस कंपनीच्या ऑपरेशन विभागातील एजीएम पदावर कार्यरत असलेल्या चैनानीकडे महिलांनी वारंवार तक्रारी केल्याचा आरोप आहे. मात्र, त्या तक्रारींकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने संशयित आरोपींना अप्रत्यक्षपणे सहकार्य केल्याचा ठपका तिच्यावर ठेवण्यात आला.
पोलिस तपासात ही बाब समोर आल्यानंतर तिच्या अटकेची कारवाई करण्यात आली. या प्रकरणातील इतर आरोपी आधीच कोठडीत असून तपास सुरू आहे. दरम्यान, या प्रकरणाने राज्यभरात खळबळ उडाली असून, प्रकरण संवेदनशील मानले जात आहे. जबरदस्तीने धर्मांतराच्या संदर्भामुळेही या गुन्ह्याची व्याप्ती वाढली आहे. या प्रकरणातील प्रमुख संशयित निदा खान अद्याप फरार असून, तिच्या शोधासाठी विशेष पथक कार्यरत आहे.
टीसीएस कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांच्या लैंगिक शोषण प्रकरणाने देशभरात मोठी खळबळ उडाली असताना या प्रकरणातील संशयित आरोपी अश्विनी चैनानी हिला गुन्हे शाखा आणि विशेष तपास पथकाने अत्यंत नाट्यमय पद्धतीने अटक केली.
पोलिसांचे पथक काही मिनिटे उशिरा पोहोचले असते, तर अश्विनी चैनानी फरार झाली असती, अशी माहिती तपासातून समोर आली आहे. 'टीसीएस'त ऑपरेशन विभागाची एजीएम म्हणून कार्यरत असलेल्या चैनानीवर महिला कर्मचाऱ्यांच्या लैंगिक शोषणाच्या तक्रारींकडे दुर्लक्ष केल्याचा गंभीर आरोप आहे.
पीडित महिलांनी वारंवार तक्रार करूनही योग्य ती कारवाई करण्यात आली नसल्याने संशयाची सुई तिच्याकडे वळली होती. याची माहिती सोशल मीडियावर आणि वृत्तवाहिन्यांवर झळकू लागल्यानंतर तिच्यावर अटकेची कारवाई होणार असल्याची माहिती तिला मिळाल्याने ती बेपत्ता झाली.
पथक तत्परतेमुळे अश्विनी ताब्यात
पोलिस तपासात अश्विनी चैनानीचे पुण्यात तीन घरे असल्याचे समजले. त्यामुळे एसआयटी पथकाने गुप्तपणे हालचाली सुरू केल्या. मात्र, तिचे मोबाइल बंद असल्याने अचूक ठावठिकाणा शोधणे आव्हान ठरत होते.
पोलिसांनी तिच्या पतीला ताब्यात घेतले असता मिळालेल्या माहितीनुसार तिचे लपण्याचे ठिकाण निश्चित करण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी त्या ठिकाणी धाड टाकली. मात्र, पथक तेथे पोहोचताच अश्विनी पळून जाण्याच्या तयारीत असल्याचे दिसले. काही क्षणांचा विलंब झाला असता तर ती निसटली असती. पोलिसांनी तत्परता दाखवत तिला जागीच ताब्यात घेतले.