

Vitthal Darshan ST bus ten lakh devotees
नाशिक : पुढारी वृत्तसेवा
आषाढी यात्रेनिमित्त ५२०० जादा बसेसच्या माध्यमातून एसटीने तब्बल ९ लाख ७१ हजार ६८३ भाविक प्रवाशांची सुरक्षित ने-आण करत त्यांना विठ्ठल दर्शन घडविले. या सेवेतून एसटीला ३५ कोटी ८७लाख ६१ हजार रुपये उत्पन्न मिळाल्याची माहिती परिवहनमंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.
मंत्री सरनाईक म्हणाले की, आषाढी यात्रेनिमित्त भाविकांच्या त्यांच्या गावापासून पंढरपूरपर्यंत ने-आण करण्यासाठी एसटीने तब्बल ५ हजार २०० जादा बसेस सोडल्या. ३ ते १० जुलै दरम्यान या बसेसने २१ हजार ४९९ फेऱ्या पूर्ण करताना तब्बल ९ लाख ७१ हजार ६८३ भाविक प्रवाशांची ने-आण केली. यातून एसटी महामंडळाला ३५ कोटी ८७ लाख ६१ हजार रुपये उत्पन्न मिळाले. मागील वर्षी मिळालेल्या उत्पन्नापेक्षा ६ कोटी ९६ लाख ३ हजार रुपयांनी अधिक आहे. सन २०२४ मध्ये आषाढी यात्रेचे एकूण उत्पन्न २८ कोटी ९१ लाख ५८ हजार रुपये इतके होते.
नाशिक विभागाकडून २२६ बसेसद्वारे १६७७ फेऱ्या करून १ लाख ३३ हजार ९९७ भाविक प्रवाशांची सुरक्षित ने-आण करण्यात आली. त्याद्वारे ५ लाख ४३ हजार ८०० किलोमीटर प्रवास होऊन सवलतीसह ३ कोटी ३० लाख ३८ हजार रुपयांचे उत्पन्न नाशिक विभागाला मिळाले.नाशिक विभागातील सर्व चालक, वाहक, यांत्रिकी कर्मचारी तसेच पर्यवेक्षक आणि अधिकारी यांनी दिवस रात्र मेहनत घेतल्याने हे शक्य झाले आहे. ते अभिनंदनास पात्र आहेत. भविष्यातही उत्पन्न वाढविण्यासाठी विभाग प्रयत्नशील राहील.
आषाढी यात्रेच्या काळामध्ये पंढरपूरमध्ये येणाऱ्या एसटी कर्मचारी व अधिकाऱ्यांची जेवणाअभावी गैरसोय होऊ नये, म्हणून प्रताप सरनाईक यांनी स्वखर्चातून ५, ६ व ७ जुलै रोजी मोफत जेवण, चहा-नाश्त्याची सोय केली होती. याचा फायदा हजारो एसटी कर्मचाऱ्यांनी घेतला. त्यांनी सेवाभावी तत्त्वावर राबविलेल्या या सुविधेमुळे अनेकांना फायदा झाला.