

नाशिक : गेल्या महिनाभरातच शहरातील ३११ जणांना डेंग्यूची लागण झाल्याचे समोर आले आहे. जिल्हा रुग्णालयातील सेंटिनल लॅबमध्ये अद्यापही ३००हून अधिक रुग्णांचे रक्तजल नमुने अहवाल प्रलंबित असल्याने जुलै महिन्यातील बाधितांचा आकडा येत्या दोन दिवसांत अधिक वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, शहरातील डेंग्यू रुग्णसंख्येचा एकूण आकडा आता ५७६वर पोहोचला आहे. (Dengue outbreak)
पावसाळा सुरू होताच शहरात कीटकजन्य आजारांचा प्रादुर्भाव वाढला. स्वाइन फ्लूपाठोपाठ डेंग्यू, चिकुनगुनिया, मलेरिया यांसारख्या आजारांनी नागरिक त्रस्त झाले आहेत. मे महिन्यात डेंग्यूचे जेमतेम ३९ रुग्ण होते. जून महिन्यात या आजाराचा प्रादुर्भाव वाढून १५५ जणांना लागण झाली. गोविंदनगरमधील वृद्ध व्यक्तीचा बळी या आजाराने घेतल्यानंतर डेंग्यूचे गांभीर्य वाढले. जुलैत पावसामुळे साचलेली पाण्याची डबकी डेंग्यूच्या फैलावास कारणीभूत ठरणाऱ्या डासांची उत्पत्तीस्थाने झाली. त्यातच जिल्हा रुग्णालयातील शासकीय लॅबमध्ये डेंग्यूसदृश रुग्णांच्या प्रलंबित अहवालांचा आकडा १०५४ पर्यंत पोहोचल्याने वाद निर्माण झाला होता.
राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्थेकडून डेंग्यू चाचणी किट प्राप्त झाल्यानंतर महापालिकेकडून प्राप्त रक्तजल नमुन्यांच्या तपासणीस वेग दिला गेला. गेल्या तीन दिवसांत ७११ प्रलंबित नमुन्यांच्या चाचण्या पूर्ण करण्यात आल्या असून, अहवाल महापालिकेला पाठविण्यात आले आहेत. त्यानुसार ७६ जणांना डेंग्यू झाल्याचे निदान झाले आहे. त्यामुळे जुलै महिन्यातील डेंग्यूबाधितांचा आकडा ३११ पर्यंत पोहोचला आहे. अद्यापही ३०० हून अधिक बाधितांचे तपासणी अहवाल प्रलंबित आहेत. ते येत्या दोन दिवसांत प्राप्त होण्याची शक्यता असून, त्यामुळे डेंग्यू रुग्णांचा आकडा अधिक वाढण्याची शक्यता आहे
जानेवारी - २२
फेब्रुवारी - ५
मार्च - २७
एप्रिल - १७
मे - ३९
जून - १५५
जुलै - ३११
डेंग्यू नियंत्रणासाठी महापालिकेच्या माध्यमातून युद्धपातळीवर उपाययोजना केल्या जात आहेत. जुलैच्या पहिल्या दोन आठवड्यांच्या तुलनेत शेवटच्या दोन आठवड्यांतील रुग्णसंख्या कमी झाली आहे. डेंग्यूची लक्षणे आढळताच नागरिकांनी रुग्णालयात उपचार घ्यावेत. डासांची उत्पत्ती होऊ नये, यासाठी दक्षता घ्यावी.
डॉ. तानाजी चव्हाण, मुख्य आरोग्य व वैद्यकीय अधिकारी, नाशिक महापालिका.