पिंपरी : शहरामध्ये सध्या डेंग्यूचा कहर वाढला आहे. जून महिन्यापासून आतापर्यंत 27 बाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामध्ये सर्वाधिक 24 बाधित रुग्ण हे एकट्या जुलै महिन्यातील गेल्या 20 दिवसांमध्ये आढळून आले आहेत. डेंग्यूबाबत खासगी रुग्णालये आणि लॅबमार्फत दररोज अद्ययावत माहिती महापालिकेस कळविणे बंधनकारक आहे; मात्र काही रुग्णालये ही माहिती आठवडाभराने कळवित असल्याची माहिती समोर आली आहे. खासगी लॅबमध्ये याबाबत विचारणा केली असता महापालिका प्रशासनाला ई-मेलद्वारे दररोज माहिती कळविली जात असल्याचे सांगण्यात आले.
खासगी रुग्णालये किंवा लॅबने एखादा रुग्ण डेंग्यू बाधित असल्याचे ठरविले तरी महापालिका प्रशासन त्याला ग्राह्य मानत नाही. महापालिकेच्या पिंपरी-संत तुकारामनगर येथील सेंटिनेल सेंटरकडे संशयित रुग्णाचा रक्तजल नमुना पाठविल्यानंतर त्यांच्याकडून रुग्ण बाधित असल्याचा अहवाल प्राप्त झाल्यावरच तो रुग्ण बाधित असल्याचे मानले जात आहे. शहरामध्ये जानेवारी महिन्यापासून आतापर्यंत एकूण 3 हजार 307 संशयित रुग्णांचे रक्तजल नमुने वायसीएम रुग्णालयातील सेंटिनेल सेंटरकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले. त्यामध्ये एकूण 27 डेंग्यू बाधित रुग्ण आढळुन आले.
शहरामध्ये जुलै महिन्यात डेंग्यूचे सर्वाधिक 24 बाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे जुलै महिन्यात डेंग्यूचा सर्वाधिक फैलाव झाल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे. त्या तुलनेत जून महिन्यामध्ये केवळ 3 बाधित रुग्ण आढळुन आले होते.
डेंग्यू रुग्णांचा वाढता कहर लक्षात घेता महापालिका वैद्यकीय विभागाकडे शहरातील खासगी रुग्णालयांनी डेंग्यू रुग्णांची अद्ययावत माहिती दररोज पाठविणे बंधनकारक आहे. मात्र, काही खासगी रुग्णालये त्याकडे सर्रास दुर्लक्ष करीत आहेत. चिंचवड येथील एका खासगी रुग्णालयातून ही माहिती मिळाली. तथापि, वैद्यकीय विभागाकडून मात्र ही माहिती दररोज मिळत असल्याचे सांगून सारवासारव करण्यात आली. दरम्यान, डेंग्यूबाबत दैनंदिन माहिती पाठविली जात असल्याचे चिंचवड येथील एका खासगी लॅबमधून सांगण्यात आले.
खासगी रुग्णालये, प्रयोगशाळा यांनी डेंग्यू रुग्णांबाबतची माहिती पालिकेला दररोज कळविणे बंधनकारक आहे. वायसीएम रुग्णालयातील सेंटिनेल सेंटरकडे संशयित रुग्णांच्या पाठविलेल्या रक्तजल नमुन्यांची तपासणी केली जाते. त्याबाबतचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतरच तो डेंग्यू बाधित रुग्ण म्हणून गृहित धरला जातो.
अभयचंद्र दादेवार, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी, महापालिका
खासगी रुग्णालये, प्रयोगशाळा (लॅब) यांच्याकडून डेंग्यू रुग्णांबाबतची माहिती पालिकेला ई-मेलद्वारे दररोज कळविली जाते. त्याशिवाय, वायसीएममधील सेंटिनेल सेंटरकडून देखील बाधित रुग्णांची माहिती पालिकेस मिळते. येथे पालिका रुग्णालयांबरोबरच खासगी रुग्णालयांतील रुग्णांच्या रक्तजल नमुन्यांचीदेखील तपासणी केली जाते.
डॉ. अंजली ढोणे, सहायक आरोग्य वैद्यकीय अधिकारी, महापालिका