

नाशिक: ऑनलाइन डेस्क - ज्येष्ठ कवी, भाषातज्ज्ञ, समीक्षक तथा चंद्रपूर येथे झालेल्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष वसंत आबाजी डहाके यांची कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
नाशिकच्या सांस्कृतिक वैभवात कुसुमाग्रज प्रतिष्ठानने जनस्थान, गोदागौरव यासह अन्य कार्यक्रमांतून स्वतंत्र ठसा उमटवला आहे. आजवर प्रतिष्ठानच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ दिग्दर्शक जब्बार पटेल, न्या.चंद्रशेखर धर्माधिकारी, ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक, न्या. नरेंद्र चपळगांवकर यांनी काम पाहिले आहे. न्या. चपळगांवकर यांचा कार्यकाळ संपल्याने अध्यक्षपदाची सूत्रे वसंत आबाजी डहाके यांच्या हाती सोपविण्याचा निर्णय प्रतिष्ठानच्या विश्वस्त मंडळाने घेतला. पुढील पाच वर्ष ते अध्यक्षपदाची धुरा सांभाळणार आहेत.
वसंत आबाजी डहाके यांचा जन्म यवतमाळ जिल्ह्यातील 'बेलोरा' या गावी ३० मार्च १९४२ साली झाला असून ते मराठीचे भाषातज्ज्ञ, कोशकार तसेच लेखक आणि कवी आहेत. त्यांचे प्राथमिक शिक्षण बेलोरा येथे तर पाचवी ते बी.ए. पर्यंतचे शिक्षण चंद्रपूर येथे झाले आहे. अगदी त्या वेळेपासून ते कविता करीत आहेत. १९६६ साली 'योगभ्रष्ट' या दीर्घ कवितेमुळे ते प्रकाशात आले. "चित्रलिपी" या संग्रहाकरिता २००९ सालच्या साहित्य अकादमी पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आले होते. तर फेब्रुवारी २०१२ च्या चंद्रपूर येथे झालेल्या ८५ व्या मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.