Swine Flu Cases Nashik | नाशिकमध्ये स्वाइन फ्लूचा उद्रेक; 43 जणांना लागण, तर 3 जणांचा मृत्यू!

Swine Flu Cases Nashik | खड्ड्यांच्या त्रासानंतर नाशिककरांवर स्वाइन फ्लूचे नवे संकट; ऑगस्टच्या 10 दिवसांत 15 नवे रुग्ण!
Bird Flu
Bird FluPudhari
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिककरांवर खड्ड्यांचे जीवघेणे संकट कायम असतानाच 'स्वाइन फ्लू'चा मोठा प्रादुर्भाव झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ४३ जणांना स्वाइन फ्लूची लागण झाली असून, त्यापैकी तिघांचा या आजाराने बळी घेतला आहे. स्वाइन फ्लू बळींमध्ये दिंडोरी तालुक्यातील चिंचखेड व पिंपळणारे गावातील दोघे तर नाशिक शहरातील आडगाव परिसरातील एकाचा समावेश आहे.

Bird Flu
Nashik-Pune Railway | नाशिक-पुणे सरळ रेल्वेमार्गासाठी गोंदे फाट्यावर जनसागर; समृद्धी महामार्गही आंदोलकांनी रोखला!

स्वाइन फ्लू हा एच१एन१ नावाच्या इन्फ्लूएंझा विषाणूमुळे होणारा श्वसनाचा आजार आहे. हा आजार खोकल्यामुळे किंवा शिंकण्यामुळे हवेतील थेंबांमार्फत एका माणसापासून दुसऱ्या माणसाकडे वेगाने पसरतो.

हवामान बदलाच्या काळात याचा प्रादुर्भाव जास्त वाढतो. पावसात हवेत आद्रतेचे प्रमाण वाढल्याने स्वाइन फ्लूच्या व्हायरसचे विषाणू दीर्घकाळ जिवंत राहतात. त्यामुळे संसर्गाचा धोका अधिक पटीने वाढतो. जानेवारी ते जूनपर्यंतच्या सहा महिन्यात स्वाइन फ्लूचे जेमतेम सात रुग्ण होते. जुलैपासून पावसाला सुरुवात झाल्यापासून स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव वाढत गेला.

जुलै महिन्यात २१ तर ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या दहा दिवसांतच तब्बल १५ नवे रुग्ण आढळले आहेत. नाशिक शहरातील ३० तर लगतच्या ग्रामीण भागातील १३ रुग्णांचा समावेश असून, यापैकी जुलैच्या शेवटच्या आठवड्यात दिंडोरी तालुक्यातील चिंचखेड येथील ६९ वर्षीय वृद्धा, पिंपळणारेतील ५५ वर्षीय पुरुष तर नाशिक शहरातील आडगाव परिसरातील ६६ वर्षीय व्यक्तीचा स्वाइन फ्लूने बळी गेला आहे.

स्वाइन फ्लूची लक्षणे

  • अचानक मोठा ताप येणे

  • खोकला आणि घसा खवखवणे

  • सर्दी आणि नाक वाहणे

  • अंगदुखी व तीव्र डोकेदुखी

  • खूप थकवा जाणवणे

  • काही रुग्णांना मळमळ, उलट्या किंवा जुलाब होणे

Bird Flu
Nashik Earthquake | रात्री 10 वाजता जमिनीतून मोठा आवाज अन् थरकाप; नाशिक जिल्ह्यात एकाच रात्री भूकंपाचे 4 धक्के

६८,१२२ नागरिकांचे स्क्रिनिंग

गेल्या जानेवारीपासून आतापर्यंत तापसदृश आजार असलेल्या ६८,१२२ नागरिकांचे स्क्रिनिंग करण्यात आले. त्यापैकी २२९ जण स्वाइन फ्लू सदृश आजाराने ग्रस्त असल्याचे आढळून आले होते. या रुग्णांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. त्यापैकी ४३ रुग्ण स्वाइन फ्लू पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. सद्यःस्थितीत १२ रुग्ण विविध रुग्णालयात ॲडमिट आहेत. आतापर्यंत तीन जणांचा मृत्यू ओढावला असून, उर्वरित २८ रुग्ण उपचारांअंती बरे झाले आहेत.

प्रतिबंधात्मक उपाय

  • खोकताना किंवा शिंकताना तोंडावर रुमाल किंवा हात ठेवावा.

  • साबनाने वारंवार हात स्वच्छ धुवावे.

  • गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे आणि गरज असल्यास मास्क वापरावा.

  • डोळ्यांना, नाकाला वारंवार हात लावू नये.

  • लक्षणे दिसल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आणि स्वतःहून औषधे घेणे टाळावे.

"शहरात सद्यःस्थितीत स्वाइन फ्लूची स्थिती नियंत्रणात आहे. नागरिकांनी घाबरून जाऊ नये. स्वाइन फ्लूची लक्षणे दिसताच त्वरित लगतच्या रुग्णालयात उपचार घ्यावेत. लक्षणे असलेल्या रुग्णांनी गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये."

— प्रशांत शेटे, प्रभारी मुख्य वैद्यकीय अधिकारी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news