Nashik-Pune Railway | नाशिक-पुणे सरळ रेल्वेमार्गासाठी गोंदे फाट्यावर जनसागर; समृद्धी महामार्गही आंदोलकांनी रोखला!

Nashik-Pune Railway | रेल्वे सरळ मार्गानेच नेण्याबरोबरच रेल्वे प्रकल्पाबाबतची जनभावना शासनापर्यंत पोहोचवून सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी केली.
Nashik-Pune Railway
Nashik-Pune Railway
Published on
Updated on

सिन्नर : पुढारी वृत्तसेवा
नाशिक-पुणे रेल्वे सिन्नर-संगमनेर-आळेफाटा-नारायणगाव-मंचर-खेड-चाकण या सरळ मार्गाने नेण्यात यावी, या मागणीसाठी सिन्नर तालुका रेल्वे कृती समितीच्या वतीने क्रांती दिनानिमित्त गोंदे फाटा येथे रविवारी (दि. ९) करण्यात आलेल्या जनआंदोलनाला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. खासदार राजाभाऊ वाजे व आमदार सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वाखाली सकाळी ९ ते ११.३० पर्यंत तब्बल अडीच तास झालेल्या रास्ता रोकोमध्ये सिन्नर, संगमनेर व अकोले तालुक्यातील सुमारे तीन ते चार हजार नागरिक सहभागी झाले. आंदोलकांच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.

Nashik-Pune Railway
Nashik Pune Railway Protest: नाशिक पुणे रेल्वेसाठी संगमनेरमध्ये सर्वपक्षीय एल्गार; सरळ मार्गावरूनच रेल्वेची मागणी

यावेळी प्रांताधिकारी शशिकांत मंगरुळे व तहसीलदार सुरेंद्र देशमुख यांना निवेदन देण्यात आले. रेल्वे सरळ मार्गानेच नेण्याबरोबरच रेल्वे प्रकल्पाबाबतची जनभावना शासनापर्यंत पोहोचवून सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी केली. नाशिक-पुणे रेल्वेमार्गाची मागणी सुमारे ४० वर्षांपासूनची आहे. सिन्नर, संगमनेर, अकोले, जुन्नर, आंबेगाव, खेड व चाकणच्या सामाजिक, औद्योगिक, कृषी व आर्थिक विकासासाठी हा मार्ग महत्त्वाचा असल्याचा कृती समितीचा दावा आहे.


आंदोलनाच्या शेवटच्या टप्प्यात पोलिसांनी आमदार तांबे यांना ताब्यात घेऊन सिन्नर पोलिस ठाण्यात आणले. सुमारे एक तासानंतर खासदार राजाभाऊ वाजे, पोलिस अधीक्षक आणि तांबे यांच्यात चर्चा झाली. त्यानंतर आमदार तांबे यांची सुटका करण्यात आली.
भूसंपादनासाठी शासनाचे कोट्यवधी रुपये खर्च झाले असताना जनतेची ठोस मागणी नसलेल्या शिर्डी-पुण्यासारखा पर्यायी मार्ग लादू नये, अशी मागणी करण्यात आली.

सिन्नर-नाशिक-संगमनेर-चाकण औद्योगिक पट्ट्याच्या विकासासाठी सरळ रेल्वे आवश्यक असल्याचे समितीने स्पष्ट केले. ४० वर्षांची मागणी असताना आणखी किती प्रतीक्षा करायची? भूसंपादनावर खर्च झालेले कोट्यवधी रुपये वाया जाऊ द्यायचे का, असा सवाल समितीने उपस्थित केला.

हा लढा आता निर्णायक टप्प्यावर असून, निर्णय होईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार, असा निर्धार बंडूनाना भाबड, बबन वाजे, हरिभाऊ तांबे, दत्ता वायचळे, राजाराम मुरकुटे, ॲड. संजय सोनवणे, सतीश नेहे, रतन पडवळ, मुकेश देशमुख यांच्यासह संगमनेर, अकोले तालुक्यातील डॉ. अजित नवले, भारत वर्ष, आनंद वर्षे, कारभारी उगले यांच्यासह समितीच्या सदस्यांनी व्यक्त केला.

सरळ मार्ग मंजुरीशिवाय लढा थांबणार नाही : आमदार तांबे

आमदार सत्यजित तांबे यांनी आंदोलनाला संबोधित करताना, नाशिक-पुणे रेल्वेचा सरळ मार्ग मंजूर होईपर्यंत लढा थांबणार नाही, असा इशारा दिला. त्यांनी डॉ. अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखालील समितीला चार दिवसांपेक्षा अधिक मुदतवाढ देऊ नये, समितीने ६० दिवसांत सकारात्मक निर्णय घ्यावा आणि तांत्रिक बाबींबरोबरच जनभावना विचारात घ्यावी, अशी मागणी केली.

समितीने सिन्नर, संगमनेर व संबंधित तालुक्यांतील गावांना भेटी देऊन नागरिकांशी संवाद साधावा, असे सांगताना यापुढील आंदोलन अधिक तीव्र केले जाईल. पुढील आंदोलन महिलांचे असेल आणि त्याची दिशा समृद्धी महामार्गाकडे असेल, असा इशाराही आमदार तांबे यांनी दिला. सरळ रेल्वेमार्गासाठी भूसंपादनाला सुरुवात झाली होती, काही शेतकऱ्यांना मोबदलाही देण्यात आला. एवढी सगळी प्रक्रिया होऊन माशी कुठे शिकली हे कळायला मार्ग नाही, असेही ते म्हणाले.

खुशीच्या मार्गाने येत समृद्धी महामार्गही रोखला

संगमनेर येथील आंदोलक शिर्डीमार्गे समृद्धी महामार्गावर चढून सिन्नरच्या दिशेने आले. त्यानंतर सुमारे ३०० ते ४०० आंदोलकांनी समृद्धी महामार्गावर ठिय्या देत वाहतूक रोखली. त्यामुळे यंत्रणेची धांदल उडाली. प्रशासनाने गोंदे फाटा परिसरात सुमारे ५०० ते ६०० पोलिस अधिकारी-कर्मचारी तसेच शीघ्रकृती दलाचे जवान तैनात केले होते. आंदोलकांनी संयम व शिस्त राखत आंदोलन केले.

रेल्वेमंत्र्यांकडे भूमिका स्पष्ट केली : खासदार वाजे

खासदार राजाभाऊ वाजे यांनी आंदोलकांना संबोधित करताना सांगितले की, दोन-तीन दिवसांपूर्वीच आमदार सीमा हिरे यांच्यासोबत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन नाशिक-पुणे रेल्वे सरळ मार्गानेच गेली पाहिजे, अशी ठाम भूमिका मांडली आहे. हा प्रश्न मी संसदेतही उपस्थित केला आहे; मात्र, रेल्वेमंत्र्यांकडून अद्याप अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही.

Nashik-Pune Railway
Nashik Pune Railway Protest: नाशिक पुणे रेल्वेसाठी संगमनेरमध्ये सर्वपक्षीय एल्गार; सरळ मार्गावरूनच रेल्वेची मागणी

मुख्यमंत्री फडणवीस, मंत्री महाजन यांची आ. तांबेंशी मोबाईलवर चर्चा

आंदोलनापूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार सत्यजित तांबे यांच्याशी संपर्क साधत आंदोलन थांबवण्याची विनंती केली. तथापि, आंदोलनाची संपूर्ण तयारी झाली असल्याने माघार शक्य नसल्याचे तांबे यांनी मुख्यमंत्र्यांना स्पष्ट शब्दांत सांगितले. दरम्यान, आंदोलनस्थळी असताना मंत्री गिरीश महाजन यांनीही मोबाईलवर तांबे यांच्याशी चर्चा केली. रेल्वे कृती समितीच्या मागण्यांवर आम्ही ठाम असून, त्या पूर्ण करण्याची मागणी लावून धरली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news