

नाशिक : ‘स्वच्छ नाशिक, सुंदर नाशिक’ अशी बिरुदावली मिरवणाऱ्या नाशिक महापालिकेचे केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षणांतर्गत देशभरातील पहिल्या दहा स्वच्छ शहरांमध्ये येण्याचे स्वप्न पुन्हा भंगले आहे. दहा लाख लोकसंख्येच्या शहरांच्या वर्गवारीत नाशिकला २२ व्या क्रमांकावर समाधान मानावे लागले आहे.
गतवर्षीच्या ३१ व्या क्रमाकांच्या तुलनेत यंदा महापालिकेने नऊ क्रमांकाची आघाडी घेतली असली तर अपेक्षित यश मात्र गाठता आलेले नाही. राज्यातील शहरांच्या तुलनेत नाशिक बाराव्या स्थानी आहे. कचरामुक्त शहरांमध्ये महापालिकेला थ्री स्टार मानांकन मिळाले आहे.
स्वच्छ भारत अभियान स्पर्धेचे यंदाचे नववे वर्ष होते. या सर्वेक्षणातून देशातील पहिल्या दहा स्वच्छ शहरांच्या यादीत झळकण्यासाठी नाशिक महापालिका प्रयत्नशील असली तरी, गेल्या आठ वर्षात नाशिकची सातत्याने पिछेहाट होत राहिली आहे. यंदा तरी नाशिकचे स्वप्न पूर्ण होईल, अशी अपेक्षा होती. परंतू, केंद्रीय शहरी विकास मंत्रालयाने जारी केलेल्या ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२४-२५’च्या निकालानंतर नाशिककरांच्या अपेक्षांवर पाणी फिरले. दहा लाख लोकसंख्येच्या शहरांच्या वर्गवारीत नाशिकला २२ व्या स्थानी समाधान मानावे लागले आहे.
२०२४-२५ या वर्षाकरीता देशभरातील शहरांचे स्वच्छता, कचरा व्यवस्थापन, मलनि:सारण व्यवस्था, सार्वजनिक ठिकाणांचे सौंदर्यीकरण, नागरी सहभाग आदी विविध निकषांवर आधारीत त्रयस्थ संस्थेमार्फत मूल्यमापन करण्यात आले. यंदा १२,५०० गुणांच्या एकूण प्रणालीमध्ये नाशिक महापालिकेने १०,१२५ गुण प्राप्त केलेत. गेल्या वर्षी महापालिकेला ३१ वा क्रमांक मिळाला होता. यावर्षी महापालिकेच्या कामगिरीत सुधारणा झाली असली तरी पहिल्या दहा शहरांच्या यादीत येण्याचे स्वप्न मात्र पुर्ण होऊ शकले नाही.
स्वच्छ सर्वेक्षणांतर्गत महाराष्ट्रातील शहरांच्या एकूण कामगिरीचा विचार करता नाशिकला राज्यात १२वा क्रमांक मिळाला आहे. १० लाख लोकसंख्येच्या शहरांमध्ये अर्थात ‘मिलियन प्लस सिटी’मध्ये नाशिक राज्यात चौथ्या क्रमांकावर आहे. देशभरातील क्रमवारीचा विचार करता राज्यातील पिंपरी चिंचवड (७), पुणे (८), ठाणे (१५), नाशिक (२२) अशी क्रमवारी आहे.
स्वच्छतेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची अशी मलनि:सारण व्यवस्थापनात सुधारणा करत नाशिक महापालिकेने ओडीफ++ वरून वॉटर प्लस प्रमाणपत्र प्राप्त केले आहे. ही सर्वोच्च पातळीची मान्यता असून शहरातील मलनि:सारण पध्दती प्रभावीपणे कार्यरत असल्याचे प्रतिक असल्याचा प्रशासनाचा दावा आहे. तसेच ‘गारबेज फ्री’ अर्थात कचरामुक्त शहरांमध्ये महापालिकेला तीन स्टार गुणांकन मिळाले आहे.
अधिकारी, कर्मचाऱ्यांचे परिश्रम, लोकसहभागामुळे स्वच्छ सर्वेक्षणात नाशिकची क्रमवारी सुधारली आहे. भविष्यातही ‘स्वच्छ नाशिक, सुंदर नाशिक’साठी अधिक व्यापक व सर्वसमावेशक स्वच्छता उपक्रम राबविण्याचा महापालिकेचा दृढनिश्चय आहे. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहर स्वच्छ व अधिक सुंदर करण्यासाठी महापालिका कटिबध्द आहे.
मनिषा खत्री, आयुक्त, नाशिक महापालिका.
क्रमवारी सुधारणेसाठी नाशिक महापालिकेने यंदा विविध उपाययोजना राबविल्या. त्याचाच एक भाग म्हणून विविध जनजागृतीपर स्पर्धांमधील तब्बल १८३७ विजेत्यांना ४८.२१ लाखांची रोख बक्षीसे जाहीर केली होती. यात आदर्श कचरा विलगीकरण करणाऱ्या ७६९ महिलांना प्रत्येकी दोन हजार रुपये, तर ६०० घंटागाडी कामगारांना प्रत्येकी तीन हजार रुपये याप्रमाणे पारितोषिक देण्याची घोषणा झाली होती.