नाशिक : केंद्र शासनाच्या माध्यमातून स्वच्छ सर्वेक्षण २०२४ ची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून येत्या आठवडाभरात केंद्रीय पथक तपासणीसाठी नाशिकमध्ये दाखल होत आहे. यंदा देशभरातील स्वच्छ शहरांच्या यादीत पहिला क्रमांक पटकाविण्याचा चंग महापालिकेने बांधला आहे. त्याचाच एक भाग म्हणून घनकचरा व्यवस्थापन विभागातील विभागीय स्वच्छता निरिक्षक, स्वच्छता निरिक्षकांची कार्यशाळा शनिवारी पार पडली.
क्वालिटी सिटी नाशिकच्या सहकार्यातून या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ.अशोक करंजकर यांच्या हस्ते डिजिटल पद्धतीने कार्यशाळेचे उदघाटन करण्यात आले. यावेळी घनकचरा व्यवस्थापन अधिनियम व संबंधित विविध विषयांवर तज्ञांमार्फत स्वच्छता निरिक्षकांना मार्गदर्शन करण्यात आले. डिटेक्टिव ट्रेनिंग स्कुलच्या ॲड. प्रतिभा ठाकरे यांनी घनकचरा व्यवस्थापन संबंधित विविध गुन्हे व त्यावरील कायदेशीर कारवाई या विषयावर मार्गदर्शन केले. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे क्षेत्र अधिकारी राजेंद्र सूर्यवंशी यांनी प्लास्टिक बंदी व त्यावरील कारवाईबाबत सखोल मार्गदर्शन केले. मानसोपचारतज्ञ डॉ. नकुल वंजारी यांनी व्यसनांचे दुष्परिणाम, वैयक्तिक स्वच्छता व आरोग्य या विषयावर मार्गदर्शन केले. अधीक्षक अभियंता अविनाश धनाईत यांनी मल:निसारण प्रकल्प व खतप्रकल्प येथील प्रक्रियेबाबत माहिती दिली.
प्रास्ताविक घनकचरा व्यवस्थापन विभागाचे संचालक डॉ. आवेश पलोड यांनी केले. स्वच्छ सर्वेक्षण 2023 मधील नाशिक मनपाची कामगिरी व स्वच्छ सर्वेक्षण 2024 साठी राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांविषयी पलोड यांनी माहिती दिली. यावेळी मनपा आयुक्त डॉ. करंजकर, क्वालिटी सिटी नाशिकचे जितूभाई ठक्कर, मनपा गोदावरी संवर्धन कक्ष उपायुक्त अजित निकत, अधीक्षक अभियंता अविनाश धनाईत, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. प्रमोद सोनवणे, कार्यकारी अभियंता बाजीराव माळी आदी उपस्थित होते.