

नाशिकरोड : वीजबिलाचा भार कमी करण्याबरोबरच स्वतःची वीज निर्माण करण्यासाठी प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेला नाशिक परिमंडळात मोठा प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत ७४ हजार ५५७ ग्राहकांनी छतावर सौर प्रकल्प उभारले असून, त्यातून २६० मेगावॉट वीजनिर्मितीची क्षमता निर्माण झाली आहे.
नाशिक परिमंडळातील अहिल्यानगर मंडळात ३० हजार ४७५ ग्राहकांनी १०२.७७ मेगावॉट, मालेगाव मंडळात ६ हजार ३५२ ग्राहकांनी २१.७४ मेगावॉट, तर नाशिक मंडळात ३७ हजार ७३० ग्राहकांनी १३५.९६ मेगावॉट क्षमतेचे सौर प्रकल्प उभारले आहेत. घराच्या छतावरील सौर प्रकल्पातून तयार होणारी वीज ग्राहक स्वतःच्या वापरासाठी वापरू शकतात. गरजेपेक्षा जास्त वीजनिर्मिती झाल्यास त्याचा लाभ वीजबिलात मिळतो. त्यामुळे पारंपरिक विजेवरील अवलंबित्व कमी होऊन ग्राहकांची बचत होते.
योजनेची माहिती आणि नोंदणी प्रधानमंत्री सूर्यघर संकेतस्थळावर करता येते. नोंदणीनंतर ग्राहकांना त्यांच्या पसंतीचा विक्रेता निवडता येतो. प्रकल्प बसवल्यानंतर अनुदान थेट ग्राहकांच्या बँक खात्यात जमा केले जाते.
नाशिक परिमंडळातील ग्राहकांनी योजनेचा अधिकाधिक लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्य अभियंता सुंदर लटपटे यांनी केले आहे. अनुदानाची सुविधा योजनेंतर्गत एक किलोवॉट क्षमतेच्या सौर प्रकल्पासाठी ३० हजार रुपये, दोन किलोवॉटसाठी ६० हजार रुपये, तर तीन किलोवॉट किंवा त्यापेक्षा अधिक क्षमतेसाठी ७८ हजार रुपयांपर्यंत अनुदान दिले जाते. हाउसिंग सोसायट्यांनाही ५०० किलोवॉटपर्यंतच्या प्रकल्पासाठी प्रतिकिलोवॉट १८ हजार रुपये अनुदानाची तरतूद आहे. सौर प्रकल्पासाठी नेट मीटर मोफत बसविण्यात येत असून, १० किलोवॉटपर्यंतच्या प्रकल्पांना स्वयंचलित मंजुरी देण्यात येते. तसेच सवलतीच्या दरात बँक कर्जाची सुविधाही उपलब्ध आहे.