

नाशिक : जिल्ह्यातील विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम (एसआयआर) अंतर्गत प्रारूप मतदारयादी सोमवारी (दि.३१) प्रसिद्ध झाली. या पुनरीक्षणामुळे जिल्ह्यातील एकूण मतदारसंख्या ५१ लाख ४ हजार ४५८ वरून ४० लाख ७६ हजार ६६६ इतकी झाली आहे. पुनरीक्षणादरम्यान तब्बल १० लाख २७ हजार ८९४ मतदारांची नावे वगळली आहेत. यात कायमस्वरूपी स्थलांतरित, मृत, दुबार नोंदणी तसेच शोध न लागलेल्या मतदारांचा प्रामुख्याने समावेश आहे, अशी माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. मधुमती सरदेसाई यांनी दिली.
'एसआयआर' प्रक्रियेत नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक १ लाख ९३ हजार २३६, तर नाशिक पूर्वमध्ये १ लाख ६० हजार ५९० नावे वगळली आहेत. नाशिक मध्य मतदारसंघात १ लाख २० हजार ७९० नावे कमी झाली आहेत. मालेगाव बाह्य मतदारसंघातील मतदारसंख्या ३ लाख ८९ हजार ७८८ वरून ३ लाख २१ हजार ११२ झाली असून, ६८ हजार ६७६ नावे वगळली. मालेगाव मध्य मतदारसंघात ७४ हजार ६५१, तर नांदगाव मतदारसंघात ४४ हजार ७६० नावे वगळली आहेत.
मतदान केंद्रांची पुनर्रचना
एसआयआर सोबतच जिल्ह्यातील मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण केले आहे. त्यानुसार मतदान केंद्रांची संख्या ४ हजार ९१९ वरून ४ हजार ९५८ झाली आहे. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार एका मतदान केंद्रावर जास्तीत जास्त १,२०० मतदारांची मर्यादा लक्षात घेऊन ही पुनर्रचना केली
प्रारूप यादीत आपले नाव आहे की नाही, याची नागरिकांनी तपासणी करावी. नाव वगळले असल्यास किंवा मतदारयादीतील तपशीलात काही त्रुटी असल्यास ३० सप्टेंबरपूर्वी दावा वा हरकत दाखल करावी. नागरिकांना मतदान केंद्रासह संकेतस्थळावरून प्रारूप मतदार यादी तपासता येणार आहे.
- आयुष प्रसाद, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, नाशिक
नवमतदारांनाही नोंदणीची संधी
या पुनरीक्षणासाठी १ ऑक्टोबर २०२६ हा पात्रता दिनांक निश्चित केला आहे. १८ वर्षे पूर्ण झालेल्या पात्र भारतीय नागरिकांना मतदार म्हणून नोंदणी करता येणार असून, नवीन नाव समाविष्ट करण्यासाठी फॉर्म ६, नावाबाबत हरकत वा वगळणीसाठी फॉर्म ७, तर पत्ता बदल, तपशीलातील दुरुस्ती किंवा दिव्यांगत्वाची नोंद करण्यासाठी फॉर्म ८ भरता येणार आहे. वयाच्या पुराव्यासाठी जन्म दाखला, आधार कार्ड, पॅनकार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, भारतीय पासपोर्ट तसेच दहावी किंवा बारावीचे प्रमाणपत्र आदी कागदपत्रे ग्राह्य धरली जाणार आहेत.
महिनाभराची संधी
प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध झाल्यानंतर नागरिकांना दावे व हरकती दाखल करण्यासाठी ३१ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर २०२६ असा कालावधी दिला आहे. या कालावधीत प्राप्त दावे-हरकतींची सुनावणी करून २९ ऑक्टोबरपर्यंत त्यावर निर्णय होणार आहे. त्यानंतर ४ नोव्हेंबर रोजी अंतिम मतदारयादी प्रसिद्ध केली जाणार आहे.
धुळे जिल्ह्यात 15 लाख 40 हजार 268 मतदार
धुळे : जिल्ह्यात मतदारयाद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघांची प्रारूप मतदारयादी आज ३१ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. प्रारूप मतदारयादीत एकूण १५ लाख ४० हजार २६८ मतदारांचा समावेश आहे. प्रारूप मतदारयादीनुसार जिल्ह्यात ७ लाख ९१ हजार ३३८ पुरुष, ७ लाख ४८ हजार ८७९ महिला आणि ५१ तृतीयपंथी असे एकूण १५ लाख ४० हजार २६८ मतदार आहेत.
जळगाव जिल्ह्यात 5.14 लाख नावांचा डेटा रडारवर
जळगाव : जिल्ह्यातील ११ मतदारसंघांसाठीची प्रारूप मतदारयादी जाहीर झाली असून, एकूण ३० लाख ३७ हजार ४५६ मतदारांचा यात समावेश आहे. मात्र, यासोबतच गणनापत्रक जमा न केलेले, मयत, स्थलांतरित आणि दुबार नोंदणी असलेल्या तब्बल ५ लाख १४ हजार ८३६ मतदारांची वेगळी यादी प्रसिद्ध होणार असल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या कार्यक्रमांतर्गत ३१ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीत नवमतदारांना नावनोंदणीसह दुरुस्तीची संधी दिली आहे.